पंढरपूर येथील वारकरी संप्रदायासही आले आहे आमंत्रण
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्रीक्षेत्र अयोध्या येथे शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्रीरामजन्मभूमीवर प्रभू श्रीरामरायाची मुर्तीं प्राणप्रतिष्ठा होत आहे.यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. श्रीरामजन्मभुमी ट्रस्ट व विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने पंढरपूर येथील वारकरी संप्रदायासही आमंत्रण आले आहे. धन्य दिवस आजी झाला सोनीयाचा।पिकली हे वाचा रामनामे।। अशा आनंदक्षणांच्या पार्श्वभूमीवर आम्हा घरी धन शब्दांचीच रत्नें। या जगद्गुरु तुकोबारायांच्या भुमिकेनुसार श्रीविठ्ठलाची व वारकरी संप्रदायाची भेट म्हणून मर्यादापूरुषोत्तम श्रीरामरायास श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांचे अखिल विश्वाच्या हितासाठी मागणी केलेले 'पसायदान ' दिले जाणार आहे.
श्रीरामाचे मंदिर हे नुसते मंदिर नव्हे तर ते राष्ट्रमंदिर आहे अशी भावना मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे.या अनुषंगाने जगभरातील कोट्यवधी लोक भविष्यात श्रीराम मंदिरास भेट देणार आहेत.रामरायाचे मर्यादापुर्ण जीवनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. व हा प्रयत्न करतेवेळी एक सद्विचार हि त्यांचेपुढे मांडावा हा वारकरी संप्रदायाचा मानस आहे. ज्या विश्व माऊली ज्ञानोबारायांनी जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो। भुता परस्परे जडो। मैत्र जीवांचे।। अशी उदात्त प्रार्थना आपल्या विश्वात्मक श्रीगुरुंकडे केली. जी आजपर्यंत कोणत्याही तत्वज्ञानात ठळकपणे दिसून येत नाही. तेव्हा या जगभरातील लोकांना आचार -विचारांचा विश्वशांतीचा संदेश या निमित्ताने गेला पाहिजे या निर्मळ हेतूने वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक देवव्रत (राणा) महाराज वासकर, राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल महाराज चवरे, कार्याध्यक्ष चैतन्य महाराज देहूकर व प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण हनुमंत महाराज वीर यांच्या संकल्पनेतून हे पसायदान मुळ मराठी ओवीरुपासह हिंदी,इंग्रजी, व संस्कृत या भाषेत ह.भ.प. यशोधन महाराज साखरे यांचे कडून व जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ परमसंगणक निर्माते डॉ.विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाषांतरित करुन घेतले आहे.
हे पसायदान चांदीच्या पत्र्यावर कोरुन देण्याची संकल्पना आहे मात्र अल्पकालावधी उपलब्ध असल्यामुळे सध्या हे पसायदान ऑफसेट प्रिंटीग करुन त्यास आकर्षक सोनेरी रंगाची चौकट बसूवन तयार करण्यात आले आहे. आज अयोध्येस प्रयाण करण्यापुर्वी सर्व महाराज मंडळी मंदिरात जाऊन हे 'पसायदान' श्री विठ्ठल रुक्मिणी व श्रीसंत चोखोबाराय, श्रीसंत नामदेव महाराज, दास मारुती यांच्या चरणास लावून आशीर्वाद घेण्यात आले. यावेळी सर्वश्री ह.भ.प.चैतन्य महाराज देहूकर , मुरारी महाराज नामदास, रघुनाथ कबीर महाराज, भाऊसाहेब गोसावी महाराज, भरत अलिबागकर महाराज, ज्ञानेश्वर तारे महाराज , रामकृष्ण वीर महाराज, केदार महाराज नामदास इ. उपस्थित होते
दिनांक २० रोजी अयोध्येस पोहचत राममंदिर ट्रस्ट कडे वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराज मंडळींच्या उपस्थितीत हे पसायदान तसेच पवित्र तुळशीची माळ , तुळशीमध्येच बनवलेले सीता-राम विशेष मंगळसुत्रही भेट दिले जाणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा