देऊळगाव महीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चुकीचे नाव सांगत केली पोलिसांची दिशाभूल
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
देऊळगाव राजा तालुक्यातील महत्वाचे समजले जाणारे अंढेरा गाव हे देऊळगाव मही नंतरची मोठी बाजारपेठ आहे.अंढेरा येथे प्राथमिक आरोग्य असुन येथे अंढेरा,सेवानगर, शिवणी आरमाळ, सावखेड नागरे,पाडळी शिंदे येथील गोरगरीब आजारी रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात.स्थानिक अंढेरा येथे पोलिस स्टेशन असुन जवळपासच्या बावन्न गावाचा कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी अंढेरा पोलिस स्टेशनवर आहे.
स्थानिक अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागिल काही महिन्यांपासून एमबीबीएस डॉक्टर नियमितपणे गैरहजर असल्याच्या बातम्या अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत.यातुन बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गिते कुठलाही बोध घेण्यास तयार नसुन दि.७जानेवारी २०२४रोजी गांगलगांव येथील महिलेचे जोरदार भांडण झाल्यामुळे जबर मारहाण झाल्याने अंढेरा पोलिसांनी तात्काळ महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा येथे नेले असता येथे एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नसल्याचे पञ देण्यात आले आणि देऊळगाव मही ला जाण्यास सांगितले.
अंढेरा पोलिसांची सदर महिलेला ग्रामीण रुग्णालय देऊळगाव मही येथे नेले असता येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर भगत यांनी सांगितले की अंढेरा येथे दोन एमबीबीएस डॉक्टर असताना मी एमएलसी करत नाही.तसेच आपले नाव जाधव सांगत अंढेरा पोलिसांची दिशाभूल केली.याबाबत अंढेरा पोलिसांनी ठाणेदार विकास पाटील यांना डॉक्टर एमएलसीसाठी नकार देत असल्याचे सांगताच ठाणेदार विकास पाटील यांनी बुलढाणा येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांना फोन केला असता त्यांनी फोन न उचलण्याचच धन्यता मानली.यानंतर ठाणेदार यांनी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांना घेऊन तात्काळ ग्रामीण रुग्णालय देऊळगाव मही गाठले व एमएलसी करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरानां जाब विचारला.यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांना सदर प्रकाराबाबत सांगितले.यानंतर येथील डॉ यांनी एमएलसी करण्यास होकार दिला.एकुण या सर्व प्रकारामुळे सर्व सामान्य जनतेबरोबर आता अंढेरा पोलिसांची सुध्दा हेळसांड होत आहे. याला काय म्हणावे?
विशेष म्हणजे अंढेरा येथे दोन्ही एमबीबीएसच्या जागा भरलेल्या असतानाच एक वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता मांन्टे हे मेडिकल सुट्टीवर असुन दुसरे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल रिंगे यांच्या कडे चिखली तालुका आरोग्य अधिकारी पदाच्या अतिरिक्त पदभार असुन ते अंत्री खेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज ड्युटी करतात. त्यामुळे अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे दोन्ही एमबीबीएसच्या जागा भरलेल्या असताना पुर्णपणे वार्यावर असते. येथे उपकेंद्रात नेमलेले बीएएमएस डॉ नेमलेले असतात. त्यांनाही उपकेंद्र सोडुन नियमबाह्य ड्युटी करावी लागते. हे नित्याचेच झाले आहे.
सर्व सामान्य गोरं गरीब आजारी रुग्ण मोठ्या आशेने वेळेवर उपचार मिळतील म्हणून अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात परंतु येथे नेहमीच वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने रुग्णांना उपचाराअभावी खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात.
“अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत तब्बल बावन्न गावे येत असुन अपघात किंवा भांडण झाल्यामुळे जबर मारहाण झालेल्या घटना घडलेल्या असताना स्थानिक अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेहमीच दोन्ही एमबीबीएस डॉक्टर नसल्याने अंढेरा पोलिसांना देऊळगाव महीला जावे लागते तेथेही एमएलसी करण्यास नकार दिला जातो. यामुळे पोलीसांनाच खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे.”
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा