आव्हानांचा सकारात्मक पद्धतीने सामना करत संघर्ष करणे गरजेचे - प्रा. करण पाटील
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (सचिन कुलकर्णी)
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये एम.बी.ए विभागातर्फे आयोजिलेल्या स्वामी विवेकानंद यांची १६० वी जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४२५ वी जयंती तर सोलापुरातील क्रांतिवीर श्रीकिसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे व कुरबान हुसेन यांना आजच्या दिवशी (१२ जानेवारी) फाशी देण्यात आली, या घटनेला ९२ वर्षे पूर्ण झाली. यामुळे स्वामी विवेकानंद, राष्ट्रमाता जिजाऊ व सोलापुरातील चारही हुतात्मे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दीप प्रज्वलनानंतर प्रास्तविकात स्वेरी अभियांत्रिकीचे प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता व एम.बी.ए विभागाचे प्रमुख प्रा. करण पाटील यांनी ‘युवाशक्तीची देशाला असणारी गरज आणि त्या माध्यमातून राष्ट्र विकासासाठी युवकांचे अतुलनीय योगदान यावर प्रकाश टाकत युवकांनी मोबाईल च्या मोहजालातून बाहेर येत स्वतःमधील आव्हानांचा सकारात्मक पद्धतीने सामना करत संघर्ष करणे गरजेचे आहे.’ असे निक्षून सांगितले. प्रा सागर सरीक यांनी प्रमुख पाहुणे प्रा. यशपाल खेडकर यांची ओळख करून दिली. प्रमुख पाहुणे प्रा.खेडकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात ‘आजचा युवक हा व्यसनाधीन होत असून त्यापासून त्यांनी लवकर बाहेर पडणे गरजेचे आहे.’ असे सांगितले.
तसेच ‘आजचा युवक कसा असावा?’ याबद्दल प्रा. खेडकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे घटक त्यांनी विस्तृतपणे विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्याचबरोबर राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रा.खेडकर यांनी विद्यार्थिनींना ‘विद्यार्थी दशेपासून एक चांगली स्त्री म्हणून जीवनात व समाजात आपण कसे वागले पाहिजे, आपल्या वागण्यातून आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल केले पाहिजे. हे सांगताना त्यांनी राजमाता जिजाऊ साहेबांच्या इतिहासातील शौर्याचे अनेक दाखले दिले. त्याचबरोबर सोलापूरचे क्रांतीवीर श्रीकिसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे व कुरबान हुसेन या चार क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचे नाव अजरामर केले.’ असे सांगून त्यांनी इतिहास सादर केला. या वेळी एमबीए मधील वर्षकांत वाघ व प्रज्ञा माळी या विद्यार्थ्यांनी देखील आपले विचार मांडले. या कार्यक्रमात विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, प्रा.मिनल भोरे, प्रा.अमाद अहमद, प्रा.कोमल कोंडूभैरी यांच्यासह इतर प्राध्यापक व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा. प्रवीण मोरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा