मा.न्यायालयाचा निर्णय - मेघराज राजेभोसले यांच्या प्रयत्नांना यश
शिवशाही वृत्तसेवा, पुणे
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अनेक सभासदांची नावे मतदार यादीतून वगळल्याबद्दल काही सभासदांनी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती.
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सभासदांनी वर्ग 'अ' चे सभासदत्व प्राप्त केले आणि तशा प्रकारचे ओळखपत्र देखील संस्थेकडून त्यांना बहाल करण्यात आले. या सभासदांनी वर्ग अ सभासत्वाचे शुल्क देखील वेळोवेळी संस्थेस दिलेले आहे. परंतु होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये यातील सभासदानी मतदार यादी मध्ये त्यांचे नाव कोठेही नमूद नसल्याने त्यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे हरकती दाखल केल्या होत्या. त्यास अनुसरून निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल दिला, ज्यामध्ये केवळ कार्यकारणीच्या बैठकीमध्ये वर्ग अ सभासदत्वचा विषय कार्यक्रम पत्रिकेवर घेतला गेला नाही हे कारण पुढे करत सदरील सभासदांचा निवडणुकीचा आणि मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला.
या निर्णयाविरुद्ध नाराज सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात अँड. युवराज नरवणकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. याचिकेची सुनावणी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. गौतम पटेल आणि मा. दिघे यांच्या खंडपीठाकडे झाली.
सभासद आणि महामंडळाच्या वतीने युवराज नरवणकर यांनी युक्तिवाद केला व घटनेतील तरतुदी आणि इतर कागदपत्रांचा आधार घेत माननीय उच्च न्यायालयाने हा प्रश्न केवळ याचिकाकर्त्या सभासदांपुरता मर्यादित नसून त्याची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट केले. सभासद पत्र (आय कार्ड)असताना आणि वार्षिक सभासदत्व शुल्क भरले असताना ही सभासदाना मतदानाच्या हक्कांपासून वंचित ठेवणे सकृतदृष्ट्या अयोग्य असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले.
सदरच्या निवडणूक अधिकार्याच्या निर्णयाचा परिणाम हजारो मतदारांवर होणार असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुकीच्या पुढील पूर्ण प्रक्रियेस स्थगिती दिली व निवडणूक अधिकारी आणि धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयास प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देऊन सुनावणी तहकूब केली. अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा