फडणवीसांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पवार - शेलार एकत्र
शिवशाही वृत्तसेवा मुंबई
राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले राजकीय पक्षाचे नेते क्रिकेटच्या राजकारणात मात्र मागील वर्षानुवर्षे एकत्र येत असल्याचे चित्र आहे. राज्याच्या राजकारणात मागील काही वर्षात यातील काही पक्षाचे संबंध कमालीचे बिघडलेले आहेत. मात्र, हे बिघडलेले संबंध मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ( एमसीए ) निवडणुकीत मात्र आड येताना दिसत नाहीत.
एमसीए निवडणुकीतील शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या पॅनलमध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले अमोल काळे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असून, ते भाजप समर्थक उमेदवार आहेत.
त्याचबरोबर कार्यकारणीसाठी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, शिंदे गटाचे विहंग प्रताप सरनाईक हे पवार - शेलार गटाचे उमेदवार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे - ठाकरे गटात विस्तवही जात नाही. असे असतानाही उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर आणि शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र वीहंग हे एकाच पॅनल मधून एकत्र निवडणूक लढवत आहेत. नार्वेकर यांच्यासाठी एकनाथ शिंदे व फडणवीसही प्रयत्न करत आहेत.
पॅनल मधील सर्व उमेदवार विजयी व्हावे त्यासाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांच्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही प्रयत्नशील असून, खेळात राजकारण आणत नाही असे सांगत या नेत्यांची अनोखी युती एमसीएच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे.
स्नेहभोजनानिमित्त सर्व एकत्रमतदानाच्या पूर्वी पवार शेलार पॅनल मध्ये सोमवारी वानखेडे स्टेडियमवर सर्व उमेदवार आणि मतदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने राजकारणात शत्रू असलेले सर्वजण क्रिकेटच्या मैदानावर एमसीएचा ताबा घेण्यासाठी एकत्र आलेले पाहायला मिळाले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा