शिवशाही वृत्तसेवा बारामती
बारामती शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस अंमलदार शितल जगताप-गलांडे यांचे 20 सप्टेंबर रोजी पहाटे डेंग्यूने पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. अवघ्या दहा दिवसापूर्वी त्यांची प्रसुती झाली होती. पणदरे तालुका बारामती येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रसूतीनंतर त्यांना डेंगूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवार पासून त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती. अखेर २० सप्टेंबर रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांचे दहा दिवसांचे बाळ पोरके झाले आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्याच्या संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज त्या पहात होत्या. प्रसूतीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत त्या पोलिस ठाण्यात दैनंदिन कामकाज पाहत होत्या. पोलीस दलाचे शिस्तप्रिय व जखमीचे तसेच मनाचा व शरीराचा कस लागणारे काम त्या अतिशय प्रसन्न मनाने करत असत. पोलीस ठाण्यातील वातावरण कायम सौहार्द पूर्ण ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
शितल गलांडे यांच्या निधनाने पोलीस दलाची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. त्यांच्यामागे पती, एक मुलगी, व दहा दिवसापूर्वी जन्मलेले बाळ, असा परिवार आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, यांनी गलांडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा