जनावरांच्या ' कोरोना ' साठी ' डीपीडीसी ' तून एक कोटी !
शिवशाही वृत्तसेवा सोलापूर
गाय, व बैलांना होत असलेल्या लंपिया चर्म रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी, जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी ) मधून एक कोटीचा निधी तातडीने उपलब्ध करावा, असे निर्देश कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाया विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालयाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार औषध उपचार करण्याकरिता आवश्यक ती लसमात्र, औषधी, फवारणीसाठी औषधी व उपकरणे, पीपीई किट, साधनसामुग्री मृत पशुधनाचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे व बाह्य स्त्रोताद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या खासगी मनुष्यबळास मानव धन देणे व इतर अनुषंगिक बाबींवर खर्च करण्यासाठी प्रति जिल्ह्याला एक कोटीचा निधी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
बाधित क्षेत्रातील लसीकरणास प्राधान्य देण्यात यावे. शासनाने निवडलेल्या कंपनीकडून 5.25 दराने लस खरेदी करावी. खरेदी करण्यापूर्वी पशुसंवर्धन आयुक्तांना कल्पना देऊन त्यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी. बाधित क्षेत्राबाहेरील पशुधनास लसीकरण करण्यासाठी शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवादाते व इतर मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून घेण्यात यावे. बाधित क्षेत्राबाहेर लसीकरण करताना, बाधित क्षेत्रातील लसीकरणावर त्याचा परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. खाजगी सेवादात्यांना देण्यात येणारे मानधन प्रति लसमात्रा तीन रुपये याप्रमाणे खर्च एक कोटीच्या निधीतून करावा.लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांनी अधिग्रहीत करून दिलेल्या वाहनांसाठी पेट्रोल, डिझेल करता येणारा खर्च, वाहनांची दुरुस्ती करावी. सर्व कार्यवाही पशुसंवर्धन आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपापसात समन्वय साधून करावी, असे निर्देशक दिले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात 43 जनावरे बाधित
सोलापूर जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाने बाधित झालेली जनावरे माळशिरस, सांगोला, उत्तर सोलापूर व करमाळा या चार तालुक्यात आहेत. आजतागायत एकूण 66 जनावरांची नोंद झाली असून, त्यात 23 जनावरे बरी झाली आहेत. सध्या 43 जनावरही बाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दैनंदिन अहवाल शासनाला सादर कराएक कोटी निधीच्या खर्चाने योग्य नियोजन करून लसमात्रा, औषधी फवारणी सामग्री व इतर अनुषंगिक सामग्रीची कमतरता पडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. करण्यात आलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल शासनास दर दिवशी सादर करण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा