पंढरपूरात पत्रकारांच्या वतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार |
पंढरपूर - प्रतिनिधी
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांची बदली झाली आहे. तर गजानन गुरव यांनी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. पंढरपुरातील सर्व पत्रकारांच्या वतीने विठ्ठल जोशी यांचा निरोप समारंभ आणि गजानन गुरव यांचा स्वागत समारंभ यानिमित्त दोन्ही अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळुंजकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन पण सत्कार करण्यात आला. पंढरपूर पत्रकार भवनात संपन्न झालेल्या या तीन अधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र सरवदे हे अध्यक्षस्थानी होते. पत्रकार प्रवीण नागणे यांनी सूत्रसंचालन केले. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांचा सत्कार पत्रकार अतुल बडवे यांच्या हस्ते, प्रांताधिकारी गजानन गुरव यांचा सत्कार रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते, तर नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळुंजकर यांचा सत्कार नागेश सुतार यांच्या हस्ते, करण्यात आला. पत्रकार सुनील उंबरे, महेश खिस्ते, शिवाजी शिंदे, यांनी सर्व पत्रकारांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.
प्रांताधिकारी गजानन गुरव
"पत्रकारांनी सन्मानित करणे ही मोठी गोष्ट आहे, जोशी साहेब आणि ढोले साहेब यांच्या नंतर पंढरपुरात काम करताना, माझी जबाबदारी वाढली आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा मला काम करताना बळ देतील." अशा भावना प्रांताधिकारी गजानन गुरव, यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या.
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी
"पंढरपूर आणि विठ्ठल माझ्या पाचवीलाच पुजला आहे, त्यामुळे पंढरपूर साठी काम करता आले हे माझे भाग्य समजतो. पंढरपुरातील पत्रकार सकारात्मक आहेत, आणि खळबळजनक बातमी करण्यापेक्षा, चुका सुधारण्यासाठी मदत करतात. तसेच अधिकाऱ्यांना नवनवीन कल्पना सुचतात. त्यामुळे काम करताना पत्रकारांची अडचण न होता मदत झाली आहे," असे उद्गार मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, विठ्ठल जोशी यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.
उपमुख्य अधिकारी सुनील वाळुंजकर
पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळुंजकर, यांनी सत्कार केल्याबद्दल सर्व पत्रकारांना धन्यवाद दिले, आणि "पंढरपुरातील पत्रकारांच्या सहकार्यामुळेच मी सुद्धा पत्रकारितेची (जर्नालिझम) ची पदवी संपादन केली, आणि विद्यापीठात द्वितीय क्रमांक प्राप्त केला," असे प्रतिपादन केले.
शेवटी रामचंद्र सरवदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले, तर मंदार लोहकरे यांनी आभार मानले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा