बार्शीतील वाणी प्लॉट येथील घटना, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
मयत रुक्मिणी फावडे |
बार्शी - प्रतिनिधी
पोटच्या मुलानेच झोपलेल्या ठिकाणी जन्मदात्या आईच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह ओढत घराबाहेर आणून झुडपात लपवून ठेवण्यात आला होता. ही घटना मंगळवार दिनांक 12 रोजी सकाळी बार्शीत उघडकीस आली. रुक्मिणी नागनाथ फावडे (वय 45, राहणार, वाणी प्लॉट, बार्शी ) असे मयत महिलेचे नाव आहे. श्रीराम नागनाथ फावडे (वय 25, राहणार, वाणी प्लॉट, बार्शी ) असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी हवालदार अरुण माळी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला रुक्मिणी व तिचा मोठा मुलगा श्रीराम फावडे हे दोघे जण एकाच ठिकाणी राहत होते. तर रुक्मिणी यांचा लहान मुलगा व पती, हे नेहमी भांडण होत असल्याने, बार्शी शहरातील डबरे गल्ली येथी वेगळे राहत होते. श्रीराम व त्याच्या आई मध्ये सुद्धा नेहमीच पैशावरून वाद होत असत. त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाल्या होत्या. दरम्यान मंगळवारी सकाळी रुक्मिणी यांचा मृतदेह वाणी प्लॉट, बार्शी येथे आढळल्याचा फोन पोलिस ठाण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता, वाणी प्लॉट येथील शिंदे यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये एका प्लास्टिक पिशवीत रुक्मिणी यांचा मृतदेह असल्याचे आढळून आले. त्यानंतर मृत महिलेचे पती नागनाथ फावडे आणि त्यांचा लहान मुलगा लक्ष्मण यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा श्रीराम हा सध्या मुंबई येथे गेल्याचे त्याच्या मोबाईल स्टेटस वरून समजल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. यापूर्वीही आई व मुलांमध्ये नेहमी भांडण होत असल्याने, मुलानेच खून केल्याचा संशय, पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान संशयित आरोपी श्रीराम याचा शोध घेण्यासाठी मुंबई येथे एक पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.
रुक्मिणी नागनाथ फावडे (वय 45) या महिलेचा डोक्यात दगड घालून खून करून, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे, प्रकरणी संशयित आरोपी विरुद्ध भादंवि 302, 201 नुसार बार्शी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे करत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा