ज्येष्ठ विनोदी साहित्यिक द मा मिरासदार यांचे निधन
साहित्य क्षेत्रावर शोककळा
मराठी साहित्यामध्ये विनोदी कथांच्या माध्यमातून स्वतःची वेगळी शैली निर्माण करणारे, आणि महाराष्ट्राला निखळ मनोरंजनातून खळखळून हसवणारे, ज्येष्ठ विनोदी साहित्यिक द. मा. मिरासदार, यांचे आज पुण्यात राहत्या घरी निधन झाले. मराठी साहित्यावर स्वतःची छाप सोडणारे, दत्तात्रय मारुती मिरासदार यांनी वयाच्या 94व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. द.मा. किंवा दादासाहेब या नावाने ओळखले जाणारे द मा मिरासदार, यांचा जन्म 14 एप्रिल 1927 मध्ये, सोलापूर जिल्ह्यात, अकलूज येथे झाला होता. तर शिक्षण पंढरपूर आणि अकलूज येथे झाले होते. बी.ए. केल्यावर काही वर्षे त्यांनी पत्रकारिता केली. त्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केले. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, आणि द मा मिरासदार, या त्रिकुटाने एकेकाळी कथाकथन करून, मराठी रसिकांना भुरळ घातली होती . माझ्या बापाची पेंड, व्यंकूची शिकवणी, भुताचा जन्म, बाबु शेलाराचे धाडस, अशा त्यांच्या अनेक कथा लोकप्रिय आहेत. चोवीस कथासंग्रह, आणि आठ चित्रपट कथा, असे त्यांचे विपुल साहित्य मराठी मनावर गारुड करत आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील कथा, कादंबरी, वगनाट्य, चित्रपट कथा, पटकथा, संवाद, अशा सर्व प्रकारात मुक्त मुशाफिरी करणारे, द मा मिरासदार, यांना राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, यासह अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा