सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत लांबणीवर
वाढत्या कोरोना संसर्गामुळे निवडणुका पाच महिने लांबल्या
मुंबई - ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यसरकारने मिनी लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश मंगळवारी जारी करण्यात आला. मात्र , ज्या संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहेत , या निवडणुका होणार आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षभरात वेळोवेळी आदेश काढून सहकारी संस्थांच्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या. 18 मार्च 2020 रोजी आदेश काढून तीन महिने निवडणुकांना मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी आदेश जारी करून सहकारी संस्थांच्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या. शेवटी 24 फेब्रुवारी च्या आदेशानुसार 31 मार्च 2021 पर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे एप्रिलमध्ये पुन्हा निवडणुकांचा बिगुल फुंकला जाणार होता. मात्र , राज्यात कोरोनामुळे मंगळवारपासून पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका ही जवळपास पाच महिने पुढे ढकलण्यात आल्या आहे त. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 क (क ) मधील तरतुदीनुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका या एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी पुढे ढकलता येत नाहीत. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या तरतुदीतून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . ज्या प्रकरणात उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अन्य संस्थांच्या निवडणुका या आहे त्या टप्प्यावर स्थगित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा