शरद पवारांवर टीका केल्याशिवाय आमचा पक्ष वाढू शकत नाही.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती
पुणे- ( प्रतिनिधी ) आम्हाला आमचे काम वाढवायचे असेल तर शरद पवार यांच्यावर टीका करावीच लागते. त्यांच्यावर टीका केल्याशिवाय आमचा पक्ष वाढू शकत नाही. मात्र, पवार यांच्या समोर आल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, कारण ही आमची संस्कृती आहे, अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
कोथरूड येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी मास्क , चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या गळाभेटी संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर पाटील म्हणाले, राजकीय विचार वेगवेगळे असणारे मित्र एकमेकांवर टीका करीत असेल, तरी समोर आल्याबरोबर एकमेकांशी प्रेमाने वागतात.
लोकसभा आणि राज्यसभेत जेव्हा कृषीविषयक कायदे मंजूर झाले, तेव्हा पवार राज्यसभेत हजर नव्हते. त्यांना जर या कागदांवर चर्चा व्हावी असे वाटत होते, तर मग त्यांनी राज्यसभेत हजर राहायला हवे होते. मात्र, त्यांचा आता आडमुठेपणा सुरू आहे. ते जाणीवपूर्वक कृषी कायद्यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. शिवसेनेने तर लोकसभेमध्ये पाठिंबा दिला आणि राज्यसभेत बहिष्कार टाकला. भाजप सरकारला जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम सुरू आहे, असा आरोपही पाटील यांनी केला. आता न्यायालयाने दीड वर्षासाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे पवार यांनी शेतकऱ्यांना रस्त्यावरून उठवण्याचे आवाहन करावे असेही ते म्हणाले.
------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा