विधानसभा अध्यक्ष पद ; महाआघाडीत रस्सी खेच
पटोलेंचा राजीनामा ; सेना, राष्ट्रवादीचा दावा : काँग्रेसमध्ये अस्वस्थता
मुंबई - ( प्रतिनिधी ) नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसचा त्या पदावर चा दावा संपुष्टात आला असून नव्याने तीनही पक्षात या पदासाठी चर्चा झाली पाहिजे , असा सूर राष्ट्रवादीकडून लावण्यात आल्याने महाविकासआघाडी मध्ये आता नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर शिवसेनेने दावा केला आहे.mahaavikas-aaghadi
नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर निवड निश्चित होताच आज गुरुवारी विधानसभेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ याच्या कडे दिला .पटोले यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अवघ्या तीन शब्दात भाष्य करून आघाडीत एकच खळबळ उडवून दिली. विधानसभेचे अध्यक्षपद तींनी पक्षात चर्चा करून ठरवण्यात आले होते. आता ते खुले झाले आहे,असे वक्तव्य पवार यांनी दिल्लीत पत्रकारांशी अनौपचारिक रित्या बोलताना केले.यांच्या या वक्तव्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
शरद पवार यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्याने प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, विधानसभेचे अध्यक्षपद तिनी पक्षांचे होते. आता ते खुले झाले आहे.त्यामुळे नव्याने विधानसभा अध्यक्ष नेमताना आघाडीतल्या तिनी पक्षात पुन्हा चर्चा होईल, असे स्पष्ट केले. पवार यांच्यात या वक्तव्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
शिवसेनेशी झाली होती डील !
आघाडी सरकारच्या स्थापनेच्या वेळी विधानसभाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रीपद यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत डील झाल्याची चर्चा होती. म्हणजे अध्यक्षपद शिवसेनेला मिळाल्यास आणखीन एक उपमुख्यमंत्रीपद निर्माण करून ते काँग्रेसला देण्याचे शिवसेनेने मान्य केले होते. पण पवारांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीकडूनही या पदासाठी दावा केला जाईल, अशी शक्यता आहे. आता या पदावरून सरकार मध्ये बऱ्याच घडामोडी होऊ शकतात.
चर्चा कुठल्या मुद्द्यावर ?
आघाडीतील सत्ता वाटपाच्या फॉर्म्युलात काँग्रेसच्या वाट्याला विधानसभा अध्यक्ष पद आले,मात्र आता विधानसभा अध्यक्षपदाबाबत चर्चा म्हणजे अध्यक्षपद कुणाला द्यावे यावर चर्चा की, अध्यक्ष पद कोणत्या पक्षाकडे द्यावे यावर चर्चा होणार ? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अध्यक्षपदाबाबत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वडेट्टीवार विरुद्ध थोरात ?
अध्यक्षपदाच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले गेल्यास त्या पक्षातील पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ हा जुना वाद नव्याने उफाळून येण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राचे बाळासाहेब थोरात आणि विदर्भाचे विजय वडेट्टीवार हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उतरू शकतात. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने काँग्रेसने उपमुख्यमंत्री पदासाठी विदर्भाचा विचार करावा गटाचा आग्रह आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद दिल्यास राष्ट्रवादीच्या विस्तारात अडथळा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे राष्ट्रवादीकडून थोरात ऐवजी वडेट्टीवार यांच्या नावाला पसंती दिली जाईल असे म्हणतात.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा