दुष्काळग्रस्त वाईत पाण्याची उधळपट्टी - रस्त्यावर रोज १५ हजार लिटर पाणी ओतण्याचा ठेकेदाराचा उद्योग

किसनवीर कॉलेज रोडवर १० ऑक्टोबरपासून टँकरच्या पाण्याची उधळपट्टी; रस्त्यासह फुटपाथ अर्धवट, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ!

Wastage of water, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई  (शुभम कोदे)

एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना आणि दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झालेला असताना, वाई शहरात मात्र पाण्याची अक्षरशः उधळपट्टी सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. सुरूर-पोलादपूर मार्गावरील वाई शहरातील किसनवीर कॉलेज रोडवर गेल्या १० ऑक्टोबरपासून दररोज तब्बल १५ हजार लिटर क्षमतेच्या टँकरमधून पाणी ओतले जात असल्याचा प्रकार सुरू आहे. 

एका बाजूला पाणीटंचाईची भीती आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावर पाण्याची अशी उधळपट्टी! मग दुष्काळाचे गांभीर्य नेमके कोणाला आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.शासनाने वाई तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला असताना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. जिल्हा प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या जात असताना संबंधित रस्त्याच्या कामासाठी दररोज टँकरने पाणी आणून रस्त्यावर फवारले जात असल्याचे चित्र दिसत आहे. 

रस्त्यावरील धूळ उडू नये आणि बांधलेल्या फुटपाथवर पाणी मारण्यासाठी हा वापर होत असल्याचे टँकरचालकाने सांगितल्याचे समजते. मात्र, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करणे कितपत योग्य आहे, याचे उत्तर संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने द्यावे.
सूरूर-पोलादपूर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात कामाचा वेग आणि दर्जा याबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्याऐवजी पाण्याचे टँकर आणून रस्त्यावर पाणी ओतण्यावरच भर दिला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या कामाच्या मोबदल्यात ठेकेदाराला नेमका किती खर्च आणि कोणत्या निकषांनुसार मंजूर केला जात आहे, याचीही चौकशी होण्याची मागणी पुढे येत आहे.
वाई बसस्थानक ते किसनवीर कॉलेजदरम्यान बांधण्यात आलेला फुटपाथ अद्याप पूर्ण झालेला नाही. फुटपाथवरून चालताना असलेल्या खड्ड्यांमुळे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी घसरून पडल्याच्या घटनाही घडल्याचे नागरिक सांगतात. 

दररोज शेकडो विद्यार्थी आणि नागरिक या मार्गावरून ये-जा करतात. अशा परिस्थितीत अपूर्ण फुटपाथ, उघडे खड्डे आणि अपुऱ्या सुरक्षिततेमुळे एखाद्याचा गंभीर अपघात झाल्यानंतरच संबंधित यंत्रणा जागी होणार का? एखादा विद्यार्थी किंवा नागरिक कायमचा जायबंदी झाल्यावरच ठेकेदाराला जाग येणार का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांनी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडे वारंवार तोंडी तसेच लेखी निवेदने देऊन मागणी केली आहे. मात्र, या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. रस्त्यावरील धूळ रोखण्यासाठी पाण्याचा वापर केला जात असल्याचे कारण पुढे केले जात असले, तरी अपूर्ण रस्ता आणि धोकादायक फुटपाथचा प्रश्न कायम आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्यात पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व असताना रस्त्यावर दररोज हजारो लिटर पाणी वापरण्याची आवश्यकता, त्यासाठीची परवानगी आणि पाण्याचा स्रोत याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे. पाण्याच्या वापराची चौकशी करावी, अपूर्ण फुटपाथ तातडीने पूर्ण करावा आणि सुरूर-पोलादपूर रस्त्याचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

दुष्काळग्रस्त वाईत पाण्याची बचत करण्याचे आवाहन केवळ सर्वसामान्यांसाठीच आहे का? नियम आणि जबाबदारी ठेकेदारांनाही लागू आहेत की नाहीत? हा प्रश्न आता वाईकरांकडून थेट प्रशासनाला विचारला जात आहे.
        -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !