कोर्ट इमारती रिकाम्या, सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर, सायबर पोलिसांकडून वेगाने तपास सुरू
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेला हादरा देणारी एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना सोमवारी समोर आली आहे. राज्यभरातील ठाणे, सातारा, सोलापूर, सांगली, बीड, हिंगोली, परभणी आणि अमरावती या तब्बल ८ जिल्हा व सत्र न्यायालयांना एकाच वेळी बॉम्बने उडवून देण्याचे धमकीचे ईमेल प्राप्त झाले आहेत. एकाच वेळी मिळालेल्या या धमकीच्या मेल्समुळे संपूर्ण महाराष्ट्रातील न्यायालय परिसरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
कोर्ट इमारती रिकाम्या, वकील अन् पक्षकारांची पळापळ
सोमवारी कामकाज सुरू असतानाच वरिष्ठ न्यायाधीशांना हे धमकीचे ईमेल प्राप्त झाले. ईमेलचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीशांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने सुरक्षा यंत्रणांना याची माहिती दिली आणि संपूर्ण परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायाधीशांसह वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि आपल्या खटल्यांसाठी आलेल्या पक्षकारांना सुरक्षेच्या कारणास्तव तत्काळ इमारतीबाहेर काढण्यात आले. बीड व इतर न्यायालयांमध्ये ईमेलची माहिती समजताच बाहेर पडण्यासाठी एकच धावाधाव झाली, ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
बॉम्ब शोधक पथक अन् पोलिसांचा ताफा दाखल
घटना उघडकीस येताच सर्वच जिल्ह्यांमधील पोलीस प्रशासन, बॉम्ब शोधक-नाशक पथक (BDDS), श्वानपथक आणि सायबर सेलने घटनास्थळी धाव घेतली.
ठाणे व सोलापूर: ठाणे नगर पोलिसांनी तातडीने न्यायालय परिसरावर नियंत्रण मिळवले. सोलापूरमध्ये रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि पोलीस ताफ्यासह संपूर्ण इमारत रिकामी करून निर्मनुष्य करण्यात आली.
सातारा व हिंगोली: सातारा जिल्हा न्यायालयात धमकीचा मेल येताच पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला. हिंगोलीत बॉम्ब शोधक पथकाने न्यायाधीशांच्या चेंबरसह सर्व दालनांची कसून तपासणी केली.
अमरावती, सांगली व परभणी: अमरावती, सांगली आणि परभणी येथेही पोलीस अलर्ट मोडवर आले असून, श्वान पथकाच्या साहाय्याने न्यायालय इमारतीची कोम्बिंग ऑपरेशन पद्धतीने झाडाझडती घेण्यात येत आहे.
सायबर पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने
एकाच वेळी राज्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिल्हा न्यायालयांना आलेले हे ई-मेल नेमके कुठून आणि कोणी पाठवले? यामागे एखादी टोळी किंवा असामाजिक तत्त्वे आहेत का? याचा शोध घेण्यासाठी सर्व जिल्ह्यांचे सायबर पोलीस दल सक्रिय झाले आहे. प्राथमिक दृष्ट्या हा केवळ खोडसाळपणा आहे की यामागे काही मोठा कट आहे, या दोन्ही शक्यता विचारात घेऊन पोलीस प्रशासन अत्यंत गांभीर्याने पुढील तपास करत आहे. न्यायालय परिसरातील बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














