वस्तापूरच्या माजी सरपंचांचे जि. प. बांधकाम उपविभागाला निवेदन, पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी
शिवशाही वृत्तसेवा, अकोट (संजय क्षीरसागर)
सातपुड्यातील आदिवासी गावांशी संपर्क साधणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या अशा रुईखेड ते मानकरी रस्त्यावरील (ग्रामपंचायत क्र. २८) महागाव गढी गावानजीक असलेला पूल मधोमध खचला (दबला) आहे. गतवर्षी आदिवासी उपयोजनांतर्गत बांधण्यात आलेल्या या पुलावरून होत असलेल्या अवजड गौण खनिज वाहतुकीमुळे कधीही मोठा अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकारची दखल घेत वस्तापूरच्या मा. गट ग्रामपंचायत सरपंचा सौ. सुनिताताई कासदे यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, अकोटच्या उपअभियंत्यांकडे निवेदनाद्वारे पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
पुलाची सद्यस्थिती व प्रवाशांची गैरसोय
रुईखेड ते मानकरी हा रस्ता सातपुड्यातील आदिवासी गावांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. या मार्गावर नेहमीच नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. याच मार्गावरून रुधाडी-पोपटखेड परिसरातील खदानीमधून गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. या अवजड आणि भरधाव वाहनांच्या सततच्या दबावामुळे गतवर्षीच आदिवासी उपयोजनांतर्गत उभारण्यात आलेला हा पूल मधोमध दबून खचला आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षाने वाढला चिंतेचा विषय
पुलाची रचना मधोमध खचल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रस्त्याची आणि पुलाची ढासळलेली स्थिती पाहता, जर वेळीच उपाययोजना केली नाही, तर कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकते. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांकडून दिला जात आहे.
प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी
पुलाखालून आणि वरून सतत धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे हा पूल पूर्णपणे कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य जीवितहानी टळावी, यासाठी सदर पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी किंवा दुरुस्ती होईपर्यंत या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी वस्तापूरच्या माजी सरपंच सुनिता कासदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











