सातारा जिल्हा बँकेत सत्तेचे नवे समीकरण - भाजप ९ राष्ट्रवादी ८ शिवसेनेला ४ जागा

मंत्र्यांचा विजय, दिग्गजांना पराभवाचा धक्का; कोरेगावात ईश्वरचिठ्ठीने सुनील माने विजयी, जयकुमार गोरेंनी सख्ख्या भावाला दिली मात
Result of the bank election, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा ( शुभम कोदे)

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकीत राजकीय प्रतिष्ठेच्या अनेक लढतींमध्ये धक्कादायक निकाल समोर आले आहेत. जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भारतीय जनता पक्षाने ९ जागांसह सर्वाधिक जागा मिळवत आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ८, तर शिवसेनेने ४ जागांवर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी विजय मिळवत जिल्हा बँकेत प्रवेश केला असला, तरी अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोरेगावमध्ये समान मते पडल्याने ईश्वरचिठ्ठी टाकण्यात आली आणि त्यात सुनील माने यांच्या बाजूने कौल लागला.

या निवडणुकीत पाटण, माण, फलटण, कोरेगाव, महाबळेश्वर आणि खंडाळा यांसारख्या मतदारसंघांतील लढती विशेष चर्चेच्या ठरल्या. काही ठिकाणी मंत्र्यांनी आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले, तर काही ठिकाणी स्थानिक नेत्यांनी प्रस्थापितांना धक्का देत विजयाची नोंद केली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीने सहकार क्षेत्रातील राजकीय ताकदीचे नवे चित्र स्पष्ट केले आहे.

पाटण सोसायटी मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या लढतीत मंत्री शंभूराज देसाई यांनी ५८ मते मिळवत सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला. या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर देसाई यांनी विजय मिळवत जिल्हा बँकेतील आपले स्थान निश्चित केले.

माण सोसायटी मतदारसंघात मंत्री जयकुमार गोरे यांनी ५३ मते मिळवत सख्खे बंधू शेखर गोरे आणि राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांचा पराभव केला. भावाविरुद्धच्या या राजकीय संघर्षात जयकुमार गोरे यांनी बाजी मारल्याने या निकालाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगली आहे.

फलटण सोसायटी मतदारसंघात संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ७१ मते मिळवत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा ११ मतांनी पराभव केला. या विजयामुळे फलटणमधील राजकीय समीकरणांनाही नवे वळण मिळाले आहे.

महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघात रूपाली राजापुरे यांनी आठ मते मिळवत शिवसेनेचे संजय मोरे यांचा चार मतांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत राजापुरे यांनी विजय मिळवला.

जावळी सोसायटी मतदारसंघात ज्ञानदेव रांजणे यांनी ३८ मते मिळवत राष्ट्रवादीचे विठ्ठल गोळे यांचा तब्बल ३० मतांनी पराभव केला. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांजणे यांच्या विजयाने जावळीतील राजकीय वर्चस्व अधोरेखित झाले.
कोरेगाव सोसायटी मतदारसंघातील निकालाने निवडणुकीत सर्वाधिक उत्सुकता निर्माण केली. सुनील खत्री आणि सुनील माने यांना समान मते मिळाल्याने विजेता निश्चित करण्यासाठी ईश्वरचिठ्ठी टाकण्यात आली. अखेर ईश्वरचिठ्ठीने सुनील माने यांना विजय मिळवून दिला. त्यामुळे माने यांचा जिल्हा बँकेतील संचालकपदाचा मार्ग मोकळा झाला.

कराड सोसायटी मतदारसंघातून उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी विजय मिळवत धनंजय पाटील यांचा पराभव केला. या निकालामुळे कराडच्या सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले आहे.
खंडाळा सोसायटी मतदारसंघात अजय भोसले यांनी २८ मते मिळवत अनिरुद्ध गाढवे यांचा अवघ्या सात मतांनी पराभव केला. भोसले हे मंत्री मकरंद पाटील यांचे समर्थक, तर गाढवे हे मंत्री जयकुमार गोरे यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे या निकालाकडे राजकीय प्रतिष्ठेच्या लढतीच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

मजूर व विणकर मतदारसंघात चंद्रकांत जाधव यांनी विजय मिळवला. विरोधी गटातील सुनील वाघ यांनी जाधव यांना पाठिंबा दिल्याने या मतदारसंघात त्यांचे पारडे जड झाले. अखेर त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला.
इतर मागास प्रवर्गातून योगेश फडतरे यांनी संदीप पाचांगणे यांचा पराभव केला. भटक्या-विमुक्त जाती-जमाती मतदारसंघातून अर्जुन काळे यांनी विजय मिळवला. अनुसूचित जाती प्रवर्गातून माजी आमदार दीपक चव्हाण यांनी सत्यवान कांबळे यांचा पराभव केला. याशिवाय विविध राखीव व संस्थात्मक मतदारसंघांतही बिनविरोध निवडी झाल्या.

भाजप सर्वाधिक जागांसह आघाडीवर; राष्ट्रवादीचीही जोरदार मुसंडी

अंतिम निकालानुसार भारतीय जनता पक्षाने ९ जागांसह पहिला क्रमांक मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ८ जागा जिंकत भाजपला कडवी टक्कर दिली, तर शिवसेनेने ४ जागांवर विजय मिळवल.
भाजपच्या वाट्याला सातारा, माण, जावळी, खटाव, मजूर-विणकर, गृहनिर्माण, पतसंस्था-पतपेढी, जनरल आणि भटक्या-विमुक्त प्रवर्गातील जागा आल्या. राष्ट्रवादीने वाई, फलटण नव्हे तर खरेदी-विक्री संघ, महिला राखीव, कराड, महाबळेश्वर, खंडाळा, इतर मागास आणि कोरेगाव या मतदारसंघांत विजय मिळवला. शिवसेनेने पाटण, फलटण, महिला राखीव आणि अनुसूचित जाती या जागांवर यश मिळवले.

एकूणच, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मंत्र्यांचे विजय, भावांमधील संघर्ष, ईश्वरचिठ्ठीचा अनपेक्षित निकाल आणि अनेक नव्या चेहऱ्यांची एन्ट्री अशा विविध घडामोडींनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या असल्या, तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या एकत्रित संख्याबळामुळे जिल्हा बँकेतील आगामी सत्तासमीकरणे कशी आकाराला येतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
        -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !