कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर सज्ज! अतिक्रमणे हटविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - १३ लाख भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासनाची तयारी

चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसरासह संपूर्ण शहराच्या स्वच्छतेवर भर, वाहतूक, आरोग्य, पाणीपुरवठा आणि सुरक्षेसाठी सर्व विभागांना कामाला लागण्याचे आदेश
Kartiki ekadashi, wari,vari, yatra, pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या सुमारे १२ ते १३ लाख भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, यात्रा कालावधीत भाविकांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले आहेत. शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी अतिरिक्त पथके नियुक्त करा, वाहतुकीतील अडथळे दूर करा आणि चंद्रभागा वाळवंटासह श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व संपूर्ण शहराच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.

कार्तिकी शुद्ध एकादशी शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी असून, यात्रा कालावधी १० ते २४ नोव्हेंबर असा आहे. या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी विविध विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा नको!
यात्राकाळात शहरातील प्रमुख रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी अतिक्रमण हटविण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनधिकृत होर्डिंग तातडीने हटविणे, वाहनतळांच्या ठिकाणी मुरमीकरण करणे आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आले. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यासह शहरात नियमित स्वच्छता राखण्यावर भर देण्यात आला.

भाविकांना पाणी, निवारा आणि आरोग्य सुविधा
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना मुबलक व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. भक्तिसागर येथे वारकरी आणि भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

मंदिर समितीने दर्शनरांगेतील बॅरिकेडिंग सुस्थितीत ठेवावे. भाविकांच्या सोयीसाठी जर्मन हँगर उभारून त्यामध्ये पिण्याचे पाणी, भोजन, सुलभ शौचालये आणि मॅटची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच अतिरिक्त खाटांची व्यवस्था करावी आणि आरोग्यदूतांची नियुक्ती करावी, असेही निर्देश देण्यात आले.

वाहतूक कोंडी, अन्नभेसळ आणि वीजपुरवठ्यावर विशेष लक्ष
चौपाळा ते शिवाजी चौक या मार्गावर रिक्षांची गर्दी होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने तातडीने कारवाई करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सरगम चौकातील राष्ट्रीय महामार्गाचे काम वाहतुकीला अडथळा ठरणार नाही, यासाठी महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच दगडी पुलावर तात्पुरते बॅरिकेडिंग करण्याच्या सूचनाही राज्य परिवहन विभागाला देण्यात आल्या.

अन्न व औषध प्रशासनाने स्वतंत्र पथके नियुक्त करून शहरातील तसेच परिसरातील खाद्यपदार्थ आणि दूध विक्री केंद्रांची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी. महावितरणने अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा करावा, तर गॅस वितरण केंद्रांवर अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावी. बसस्थानक परिसरात शुद्ध पिण्याचे पाणी आणि नियमित स्वच्छतेची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले.

वाखरीतील जनावरांच्या बाजारासाठी स्वतंत्र पथक
कार्तिकी यात्रेदरम्यान वाखरी येथे मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरत असल्याने पशुवैद्यकीय विभागाने स्वतंत्र पथक नियुक्त करावे. जनावरांचे लसीकरण, औषधोपचार तसेच जनावरे आणि पशुपालकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

बैठकीत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दर्शनरांग व दर्शनमंडपातील सुविधांची माहिती दिली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नगरपरिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या व्यवस्थेचा आढावा सादर केला.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिताराम डुबल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पाटबंधारे विभाग, राज्य परिवहन विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीसह विविध विभागांच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.

भाविकांची सुरक्षितता, सुविधा आणि वाहतूक व्यवस्था यांना केंद्रस्थानी ठेवून कार्तिकी यात्रा सुरळीत, सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. कोणत्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी यावेळी दिल्या.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !