पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
जनावरांची निर्दयपणे वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा संशय आल्याने महाबळेश्वर परिसरात दोन वाहनांमधून वाहतूक करण्यात येणाऱ्या सहा जनावरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ११ नोव्हेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास विखरवाडी (वाडा,कुंभारोशी) ते महाबळेश्वर मार्गावर दोन वाहनांमधून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळाली. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी सिद्धार्थ लाखे यांनी माहितीची खातरजमा केली असता महाबळेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो आणि टाटा कंपनीच्या पिकअप वाहनातून जनावरांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.
या दोन्ही वाहनांमध्ये एकूण सहा जनावरे आढळून आली. त्यामध्ये बोलेरो वाहनातून तीन, तर पिकअपमधून तीन जनावरांची वाहतूक केली जात होती. जनावरांना पुरेसे खाद्य-पाणी न देता तसेच दाटीवाटीने आणि निर्दयपणे बांधून वाहतूक केली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात बोलेरो वाहनचालक जीवन दत्तात्रय कुंभार (वय २८, रा. रेठरे कारखाना, ता. कराड), पिकअप वाहनचालक करण बबन जाधव (वय २२) आणि बबन सुखदेव जाधव (वय ४५, दोघे रा. वाडांबुंरेशी, ता. महाबळेश्वर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही वाहनातील जनावरांची एकूण किंमत सुमारे दीड लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम, केंद्रीय मोटार वाहन नियम आणि भारतीय न्याय संहिता यांतील संबंधित कलमान्वये महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९५/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाबळेश्वर पोलीस करीत आहेत.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











