प्रथेमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन यांच्या गायनाने वाईकर मंत्रमुग्ध!
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - दीपावली पाडव्याचे औचित्य साधून वाई येथील ऐतिहासिक महागणपती घाटावर आयोजित करण्यात आलेल्या ‘दीपोत्सव स्वरांचा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाला वाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भक्तिगीत, भावगीत आणि नाट्यगीतांच्या सुरेल आविष्काराने कृष्णामाईचा काठ संगीतमय झाला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर रंगमंचावरील मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. विधानपरिषदेचे आ. धैर्यशील कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
साक्षी कन्स्ट्रक्शन, इंद्रजा कन्स्ट्रक्शन, मोशन लर्निंग एक्सप्रेस, बिल्डर असोसिएशन, इंडिया व्हॉइस सेंटर आदी प्रायोजकांच्या सहकार्याने महागणपती घाटावर हा सांगीतिक सोहळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने वाईकरांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी नमूद करून त्यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे स्वागत केले.
विधानपरिषदेचे आ. धैर्यशील कदम यांनी आपल्या मनोगतात दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. महागणपतीच्या साक्षीने आणि कृष्णामाईच्या पवित्र तीरावर आयोजित या कार्यक्रमाचा वाईकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. वाईमध्ये यापूर्वी आयोजित लघुकुंभ सोहळ्याला लाखो भाविकांनी उपस्थिती लावून कृष्णामाईचे आणि साधुसंतांचे दर्शन घेतल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीतून शेतकरी बांधवांना सावरण्याची ताकद मिळावी, तसेच बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना त्यांनी महागणपतीच्या चरणी केली. उपस्थित वाईकरांना व त्यांच्या कुटुंबीयांना दीपावलीच्या शुभेच्छा देत त्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक प्रथेमेश लगाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या सुरेल सादरीकरणातून भावगीत, भक्तिगीत आणि नाट्यगीतांची रंगतदार मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली. महागणपती घाटावरील नयनरम्य वातावरण, कृष्णामाईचा किनारा आणि सुरेल संगीत यामुळे दीपावली पाडव्याच्या आनंदात विशेष भर पडली.
यावेळी आ. धैर्यशील कदम, नगराध्यक्ष अनिल सावंत, उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पंचायत समिती सदस्य सुरभी भोसले, स्वप्निल गायकवाड, सचिन पाटील, दीपक ननावरे, रोहित वाडकर, प्रतापराव यादव, सरिता सावंत, विजय पाटणे, संतोष जमदाडे, आप्पा मालुसरे, सचिन गांधी, प्रवीण जाधव, निलेश मोरे, डॉ. मकरंद पोरे, स्वप्नील भिलारे, संदेश सावंत, ज्येष्ठ नागरिक, महिला व मोठ्या संख्येने वाईकर उपस्थित होते.
दिवाळीच्या आनंदाला सुरेल स्वरांची साथ देणारा हा कार्यक्रम वाईच्या सांस्कृतिक वैभवात आणखी एक सुंदर आठवण निर्माण करून गेला. नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी विशेष कौतुक केले.
Diwali music concert, Mugdha vaishampayan, Prathamesh lagate, mayor Anil Sawant, Wai, satara, shivshahi news,
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











