संख्याबळ भाजपचे, पण सत्ता राष्ट्रवादीच्या झोळीत! सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीने उघड केला महायुतीतील अंतर्गत संघर्ष

बिनविरोध निवडीमागे दडलेले राजकीय पैलू, नेत्यांच्या परस्परविरोधी विधानांमुळे महायुतीत खळबळ!
BCC bank chairman vice chairman, selection unappose, ministers of district, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उदयसिंह विलासराव पाटील (उंडाळकर) आणि उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली असली, तरी या सत्तेच्या समीकरणाने महायुतीमधील अंतर्गत राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आणला आहे. बँकेत भाजपचे संख्याबळ सर्वाधिक असतानाही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही महत्त्वाची पदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने महायुतीच्या फॉर्म्युल्यावर आणि परस्पर समन्वयावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संख्याबळ भाजपचे, पण सत्तावाटप राष्ट्रवादीच्या बाजूने
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात भाजपचे संख्याबळ स्पष्टपणे अधिक असल्याने अध्यक्षपदावर भाजपचा दावा नैसर्गिक मानला जात होता. आमदार जयकुमार गोरे यांनीही भाजप हा सर्वांत मोठा पक्ष असल्याने अध्यक्षपदाची अपेक्षा असणे चुकीचे नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, प्रत्यक्षात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या राजकीय समन्वयामुळे भाजपला अध्यक्षपदापासून दूर राहावे लागले. राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील (उंडाळकर) अध्यक्षपदी विराजमान झाले, तर उपाध्यक्षपद दीपक चव्हाण यांच्याकडे गेले. या राजकीय घडामोडींमुळे भाजपच्या संख्याबळाचा सत्तेच्या वाटाघाटीत अपेक्षित फायदा झाला नाही, हे स्पष्ट झाले आहे.

जयकुमार गोरेंचा ‘आगे आगे देखो’ चा इशारा, तर शिवेंद्रसिंहराजेंकडून हिशेब मांडणी
अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीत ऑल इज वेल असल्याचे सांगितले असले, तरी 'हा नेमका कोणता फॉर्म्युला होता, हे वरिष्ठ नेत्यांनाच माहीत,' असे सांगत स्वतःला या निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवले. तसेच, ‘कुठलीही निवडणूक अंतिम नसते, आगे आगे देखो होता है क्या!’ असे सूचक विधान करत त्यांनी भविष्यातील राजकीय संकेतांची टूम सोडली.

यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आणि महायुतीचा धर्म पाळत आपण विजयाची खात्री असतानाही माघार घेतल्याचे स्पष्ट केले. "झाले तर आमच्यामुळे आणि नाही झाले तर आमचा संबंध नाही, ही भूमिका योग्य नाही," असा थेट प्रतिप्रश्न करत त्यांनी गोरेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

शंभूराज देसाईंचे ‘जालीम औषध’ अन् मकरंद आबांचा मध्यस्थीचा सूर
या राजकीय कलगीतुऱ्यात मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतील जुन्या जखमांची आठवण करून देत, ‘काही जखमा वरून बऱ्या झाल्यासारख्या दिसतात, पण त्यासाठी जालीम औषध लागते,’ असे मार्मिक विधान केले. त्यांच्या या विधानाने जुनी कटुता अजूनही कायम असल्याचे संकेत दिले.

याच्या उलट भूमिका मांडत मंत्री मकरंद पाटील यांनी, राजकारणात जुन्या गोष्टी विसरून नेहमी पुढे जायचे असते, असा सल्ला दिला. महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय झाला असून, स्वर्गीय अजित पवारांनी दिलेला शब्द पाळल्याचे त्यांनी नमूद केले. तर नवनिर्वाचित अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया देत, आगामी काळात इतर घटकांनाही संधी मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.

एक निवड, अनेक राजकीय संदेश!
सातारा जिल्हा बँकेची ही निवडणूक वरकरणी बिनविरोध पार पडली असली, तरी महायुतीतील मतभेद, वर्चस्वाची स्पर्धा आणि पक्षांतर्गत अस्वस्थता या निमित्ताने तीव्रतेने बाहेर आली आहे. राष्ट्रवादी-शिवसेनेच्या बेरजेच्या राजकारणाने भाजपच्या अपेक्षेला जरी तात्पुरता धक्का दिला असला, तरी नेत्यांच्या विधानावरून आगामी काळात हा अंतर्गत संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी जिल्हा परिषद व इतर निवडणुकांमध्ये महायुतीची ही आघाडी कायम राहणार की नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळणार, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !