पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत दौलतनगर येथे कौशल्य, गुणवत्ता व गतिमानता कार्यक्रमाचा शुभारंभ
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (शुभम कोदे)
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि विकासकामांचा वेग वाढविण्यासाठी पाटण पंचायत समितीने आता प्रशासनाच्या कार्यपद्धतीत गुणात्मक बदल घडविण्याचा निर्धार केला आहे. याच उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या 'कौशल्य, गुणवत्ता व गतिमानता' कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत दौलतनगर (मरळी) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे करण्यात आला.
यावेळी बोलताना पालकमंत्री देसाई यांनी प्रशासकीय यंत्रणेला लोकाभिमुख आणि गतिमान कामकाजाचा कानमंत्र दिला. ते म्हणाले, पाटण तालुक्यात जनता दरबाराच्या माध्यमातून गतिमान प्रशासन कसे असते, हे आपण दाखवून दिले आहे. शासकीय अधिकारी हे लोकप्रतिनिधींप्रमाणेच जनतेचे सेवक आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागाने जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत जबाबदारीने काम केले पाहिजे. केवळ योजनांची अंमलबजावणी करणे पुरेसे नाही, तर त्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रशासकीय कामकाजाचा दर्जा उंचावणे, विकासकामांमधील अडथळे दूर करणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय वाढविणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी एकत्रितपणे आणि समन्वयाने काम करून पंचायत समितीचे कामकाज अधिक लोकाभिमुख करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या उपक्रमात पाटण पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम यांसह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. जिल्हा परिषद सातारा येथील विविध विभागांचे विभागप्रमुखही यावेळी उपस्थित होते. आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आशा सेविका, शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक तसेच पशुसंवर्धन व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
प्रशासकीय कौशल्यवृद्धी, सेवांचा दर्जा सुधारणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि कामकाजातील विलंब कमी करणे या मुद्द्यांवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून भर दिला जाणार आहे. विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेऊन अडचणींची कारणे शोधणे, त्यावर ठोस उपाययोजना आखणे आणि विकासकामांसाठी समन्वित कार्यपद्धती विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
पाटण तालुक्याच्या विकासासाठी प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता वाढविणे ही काळाची गरज आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजात कौशल्य, गुणवत्तापूर्ण सेवा आणि गतिमानता प्रत्यक्षात उतरल्यास शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना अधिक प्रभावीपणे मिळू शकणार आहे. त्यामुळे या उपक्रमाचे खरे यश हे प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजात किती सकारात्मक बदल घडतो, यावर अवलंबून राहणार आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











