मुलासमोरच दुचाकीस्वारांचा बेछूट गोळीबार, पवित्र नगरीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)
भक्ती आणि वारीचा गजर सुरू असतानाच कार्तिकी वारीच्या अवघ्या दोन दिवस आधी श्रीक्षेत्र पंढरपूर शहर गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे. शहरातील इसबावी परिसरातील नवशक्ती चौकाजवळील उमानगर भागात सराईत गुन्हेगार राजा भिंगे याची भरवस्तीत गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. आपल्या मुलासोबत रात्रीच्या सुमारास फिरायला बाहेर पडले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या थरारक घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, वारकऱ्यांच्या पवित्र नगरीत पुन्हा एकदा गँगवॉरचा भडका उडाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राजा भिंगे हे जेवण आटोपून आपल्या मुलासोबत उमानगर परिसरात फिरायला बाहेर पडले होते. याच संधीचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गाठले आणि काही कळायच्या आतच त्यांच्या मुलासमोरच पिस्तुलातून गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी भिंगे यांच्या दिशेने तब्बल तीन राऊंड फायर केले. हा हल्ला इतका भीषण होता की, गोळ्या लागल्याने राजा भिंगे जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच पळापळ आणि आरडाओरड सुरू झाली. स्थानिक नागरिकांनी व नातेवाईकांनी त्यांना तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
जुन्या वैमनस्यातून हत्येचा संशय
मृत राजा भिंगे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता. २०१७ मध्ये पंढरपुरात अत्यंत गाजलेल्या नगरसेवक नामदेव भोईटे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी तो एक होता. त्यामुळे ही हत्या त्याच जुन्या वैमनस्यातून बदला घेण्यासाठी करण्यात आली आहे का, की शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये पुन्हा गँगवॉर सुरू झाले आहे, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची नाकाबंदी केली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र, टाळ-मृदुंगाचा जयघोष आणि अबीर-गुलाबाच्या सुगंधात न्हाऊन निघणाऱ्या पंढरीच्या रस्त्यांवर ऐन कार्तिकी वारीच्या तोंडावर रक्ताचे सडे पडल्याने भाविक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे पंढरपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
----------------
----------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











