निवडणूक जिंकण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा चेहरा पुढे;विजयाच्या चर्चेत मात्र नावाचाही विसर

मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर घेतली होती माघार आणि महायुतीसाठी समन्वयकाची भुमिका
DCC Bank election result, shivendra Raje Bhosale, satara, shivshahi news, jaykumar gore,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने विजय मिळवला असला, तरी या विजयाचे राजकीय विश्लेषण केले तर जिल्ह्यातील सत्तेची समीकरणे वेगळाच संदेश देताना दिसतात. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने ९, राष्ट्रवादी काँग्रेसने ८ आणि शिवसेनेने ४ जागा मिळवल्या. या आकडेवारीवर नजर टाकली तर भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला असला, तरी राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून १२ जागांवर पोहोचतात. त्यामुळे महायुतीच्या विजयात भाजपचे संख्याबळ अधिक असले, तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्रित ताकदही तितकीच महत्त्वाची ठरते. महायुतीच्या नावाखाली निवडणूक लढवली गेली; मात्र प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची एकजूट अधिक प्रभावी राहिली. भाजप हा महायुतीचा प्रमुख घटक असला तरी तिन्ही पक्षांमध्ये अपेक्षित राजकीय मनोमिलन झालेले नाही. उलट, जिल्हा परिषद निवडणुकीपासून सुरू असलेली राष्ट्रवादी-शिवसेनेची जवळीक जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही कायम राहिली. या संपूर्ण प्रक्रियेत महायुती टिकवून ठेवण्यासाठी तसेच घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान, मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा समन्वय महत्त्वाचा
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची स्वतःची मतांची ताकद मोठी होती. त्यामुळे अधिक जागांवर आग्रह धरण्याची राजकीय क्षमता त्यांच्याकडे होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान देत त्यांनी काही जागांवर माघार घेतली. स्वतःच्या राजकीय ताकदीपेक्षा महायुतीचा समन्वय महत्त्वाचा मानून त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्याची भूमिका स्वीकारली. याच समन्वयातून जिल्हा बँकेत महायुतीला सत्ता मिळवता आली.

या पार्श्वभूमीवर भाजपला मिळालेल्या नऊ जागांकडेही केवळ पक्षाच्या यशाच्या दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. या जागांमागे शिवेंद्रसिंहराजे यांनी केलेली जुळवाजुळव, घेतलेली तडजोड आणि घटक पक्षांना सोबत घेण्यासाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे होते, ही राजकीय वस्तुस्थिती आहे. स्वतःच्या जागांची संख्या वाढवण्याची संधी असतानाही महायुतीची सत्ता टिकवण्याला प्राधान्य देणारी भूमिका त्यांनी घेतली.

महायुती वरिष्ठांनी जुळवली, स्थानिक पातळीवर मात्र मनोमिलनाचा अभाव
जिल्ह्यातील महायुतीचे समीकरण वरिष्ठ पातळीवरून निश्चित झाले. मात्र वरिष्ठांनी ठरवलेली युती स्थानिक पातळीवर मनापासून स्वीकारली गेली का, हा या निवडणुकीतून समोर आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जी जवळीक दिसली, ती जिल्हा बँकेतही कायम राहिली. दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये राजकीय विश्वासाचे वातावरण निर्माण झालेले दिसत नाही. निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र येणे आणि भविष्यातही एकत्र राजकारण करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जिल्हा बँकेच्या निकालाने हाच फरक अधोरेखित केला आहे.

जयकुमार गोरेंच्या राजकीय भूमिकेची जिल्ह्यात चर्चा
या निवडणुकीतील अंतर्गत राजकारणाचा महत्त्वाचा विषय म्हणजे मंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका. मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात सत्यजित पाटणकर यांना सर्व ताकदीनिशी रसद पुरवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच मंत्री मकरंद पाटील यांच्या मतदारसंघातही जयकुमार गोरे यांनी लक्ष घालून भाजपच्या जागा वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. याचबरोबर गोरे यांचे समर्थक मानले जाणारे अर्जुन काळे यांच्या जागेवर त्यांना राजकीय धक्का देण्यासाठी जिल्ह्यातील काही नेते एकत्र आल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे महायुतीतील नेत्यांमधील राजकीय स्पर्धा आणि अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.

येथे महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, महायुतीतील घटक पक्षांनी एकमेकांच्या राजकीय ताकदीला बळ द्यायचे की एकमेकांच्या मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे? जयकुमार गोरे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आणि जिल्ह्यातील इतर नेत्यांची भूमिका यामुळे भाजपमधील अंतर्गत समीकरणे तसेच महायुतीतील घटक पक्षांमधील संबंध यांना नवे वळण मिळत आहे. याचा परिणाम आगामी जिल्ह्याच्या राजकारणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मकरंद पाटील, शंभूराज देसाई आणि शिवेंद्रसिंहराजे एकत्र येणार?
या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू समोर येतो. मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यातील राजकीय जवळीक अधिक दृढ होण्याची शक्यता असून सहकाराच्या राजकारणात या दोघांसोबत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही भूमिका महत्त्वाची ठरू शकते. विशेषतः जिल्हा बँकेच्या राजकारणात तिन्ही नेत्यांचे हितसंबंध एकत्र येण्याची शक्यता आहे. यामुळे एका बाजूला राष्ट्रवादी-शिवसेनेची एकजूट आणि दुसऱ्या बाजूला सहकाराच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत तयार होणारे नवे समीकरण, असे जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र आकार घेऊ शकते.

अशा परिस्थितीत मंत्री जयकुमार गोरे यांच्या राजकीय भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. ते महायुतीतील घटक पक्षांशी समन्वय साधणार की स्वतंत्र राजकीय ताकद वाढवण्याच्या प्रयत्नांवर भर देणार, हा आगामी काळातील कळीचा प्रश्न असेल.

निवडणुकीसाठी शिवेंद्रसिंहराजेंचा चेहरा पुढे, विजयाच्या चर्चेत मात्र नावाचाही उल्लेख नाही?
या संपूर्ण राजकीय घडामोडींमधील सर्वांत महत्त्वाचा आणि दुर्लक्षित करता न येणारा मुद्दा म्हणजे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या योगदानाचा. जिल्ह्यात निवडणुका जिंकण्यासाठी त्यांची राजकीय ताकद, त्यांचा चेहरा आणि त्यांचा प्रभाव पुढे करायचा; मात्र निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विजयाच्या चर्चेत त्यांच्या नावाचा साधा उल्लेखही करायचा नाही, अशी राजकीय पद्धत कितपत योग्य, असा प्रश्न उपस्थित होतो. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार स्वतःच्या जागांवर तडजोड केली, घटक पक्षांना सोबत घेतले आणि भाजपच्या नऊ जागांसाठीही अनुकूल राजकीय वातावरण निर्माण करण्यात भूमिका बजावली. त्यामुळे त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष होणे त्यांना पटणारे किंवा पचणारे नाही, असा राजकीय अर्थ या घडामोडीतून काढला जात आहे.

महायुतीचा विजय, पण संघर्षाची नांदी?
जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेनेने दाखवलेली एकजूट भविष्यातही कायम राहिली आणि भाजपला जिल्ह्यात स्वतंत्रपणे राजकीय ताकद वाढवण्याची संधी मिळू न देण्याचे समीकरण तयार झाले, तर जिल्ह्यातील संघर्ष आणखी वाढू शकतो. दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत कुरघोड्या आणि नेत्यांमधील स्पर्धा यावर नियंत्रण मिळवणेही महायुतीसमोरचे आव्हान असेल.

एकूणच, जिल्हा बँकेच्या निवडणुकीने महायुतीला सत्ता मिळवून दिली; पण त्याचवेळी जिल्ह्यातील राजकीय मैत्री, महत्त्वाकांक्षा, परस्पर अविश्वास आणि नेतृत्वाच्या श्रेयाचा प्रश्नही समोर आणला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान देत महायुती टिकवण्यासाठी घेतलेली समन्वयाची भूमिका, जयकुमार गोरे यांची राजकीय वाटचाल आणि राष्ट्रवादी-शिवसेनेची कायम असलेली जवळीक या तीन घटकांभोवतीच आता साताऱ्याच्या राजकारणाची पुढील दिशा फिरताना दिसणार आहे. महायुतीचा विजय झाला असला, तरी या विजयातून निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणांची खरी परीक्षा आगामी काळात होणार आहे.
----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !