संकटाचा सामना धैर्याने व आत्मविश्वासाने करता यावा यासाठी जानकी महिला स्वयं सहाय्यता समूहाचा उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - ग्रामीण भागातील महिलांमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी आणि कोणत्याही संकटाचा सामना धैर्याने व आत्मविश्वासाने करता यावा, यासाठी जानकी महिला स्वयं सहाय्यता समूहाच्या वतीने नुकताच राबवण्यात आलेल्या ‘मिशन आत्मसंरक्षण’ उपक्रमाला कुंभारवाडा ओझर्डे येथे महिला आणि तरुणींचा उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामुळे परिसरातील महिलांच्या आत्मविश्वासाला एक नवी दिशा मिळाली आहे.
सध्याच्या काळात महिलांची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यशाळेत जनजागृती विकास प्रबोधन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विशाल कुमठे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
संकटाच्या प्रसंगी प्रसंगावधान कसे राखावे, आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना कसा करावा आणि स्वतःचे रक्षण कसे करावे, याचे प्रात्यक्षिकांसह धडे देण्यात आले. महिलांचे सक्षमीकरण केवळ आर्थिक स्वावलंबनापुरते मर्यादित नसून त्यांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सुरक्षित आणि स्वावलंबी बनवणे गरजेचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. ‘सक्षम महिला – सुरक्षित समाज’ हा मुख्य संदेश या कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात आला, ज्याने उपस्थितांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण केला.
प्रत्येक मुलगी सक्षम, प्रत्येक महिला सुरक्षित आणि प्रत्येक कुटुंब आत्मविश्वासपूर्ण बनविण्याच्या उद्दिष्टाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची मालिका भविष्यातही सुरू ठेवण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहकार्य करणाऱ्या सर्वच घटकांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
महिला जेव्हा स्वसंरक्षणात सक्षम होतात, तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि समाज सुरक्षित होतो. 'मिशन आत्मसंरक्षण'मुळे आमच्या मनातील भीती दूर होऊन एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.सहभागी महिला, ओझर्डे
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











