सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांचा सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून सन्मान!
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात सन २०२६ चा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात, शांततेत आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करणाऱ्या उत्कृष्ट १२ गणेश मंडळांना ‘जिल्हास्तरीय गणराया अवॉर्ड २०२६’ देऊन गौरविण्यात आले. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते या मंडळांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे यांनी जिल्हास्तरीय शांतता समिती तसेच गणेश मंडळांच्या बैठका घेऊन "No DJ, No Dolby, No Laser Light" या संकल्पनेचा स्वीकार करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील अनेक गणेश मंडळांनी पारंपरिक व घातक ध्वनिक्षेपकांचा वापर टाळून पर्यावरणपूरक तसेच विविध सामाजिक उपक्रमांवर भर दिला.
या कालावधीत गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, आरोग्य व सामाजिक जनजागृतीपर कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम राबवले. जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एका मंडळाची निवड करून अशा एकूण १२ मंडळांना दि. ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील 'संवाद हॉल' मध्ये सन्मानित करण्यात आले.
सन्मानित गणेश मंडळे व अध्यक्ष:आदर्श गणेश उत्सव मंडळ, मोहोळ (अध्यक्ष: श्री. संकेत गणेश मुंडासे)शिवप्रेमी तरुण मंडळ, बी. बी. दारफळ (अध्यक्ष: महेश दत्तात्रेय साठे)लोकमान्य गणेश मंडळ, अक्कलकोट (अध्यक्ष: मिलन मल्लप्पा कल्याणशेट्टी)श्री जगदंबा गणेश उत्सव सांस्कृतिक व सामाजिक क्रीडा मंडळ, कसबा पेठ, माढा (अध्यक्ष: महेश नारायण भांगे)आझाद गणेश मंडळ, बार्शी (अध्यक्ष: सुरज बाळासाहेब बरीदे)कोष्टी गल्ली गणेश मित्र मंडळ, टेंभुर्णी (अध्यक्ष: वैभव शशिकांत वाघावकर)शनिराज गणेश मित्र मंडळ, कुर्डूवाडी (अध्यक्ष: प्रतीक सोमनाथ शेंबडे)लोकप्रिय भैय्यू देशीय गणेश तरुण मंडळ, महिम, ता. सांगोला (अध्यक्ष: गणेश दत्तात्रीय गोरवे)जय भवानी गणेश उत्सव मंडळ, नंदेश्वर, ता. मंगळवेढा (अध्यक्ष: वीराज बिरा रूपनर)वक्रतुंड गणेश उत्सव तरुण मंडळ, ईसबावी, पंढरपूर (अध्यक्ष: नितीन काशिनाथ लाड)आझाद तरुण मंडळ, आझादचा राजा, नातेपुते (अध्यक्ष: सिद्धार्थ सतीश जमदाडे)छावा ग्रुप गणेश मंडळ, नेवरे, ता. माळशिरस (अध्यक्ष: शेखर अशोक बोबडे)
भविष्यातही असाच पायंडा पाडावा - पोलीस प्रशासनाचे आवाहन
या प्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कत्ते यांनी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांचे आभार मानले. भविष्यातही सर्व मंडळांनी ध्वनिप्रदूषण टाळून, पर्यावरणाचे रक्षण करत आणि नवनवीन सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या या उपक्रमामुळे "उत्सवातून समाजसेवा आणि भक्तीतून पर्यावरण संवर्धन" हा सकारात्मक संदेश संपूर्ण जिल्ह्यात पोहोचला आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











