खाकी वर्दी मागचा माणूस मुलांसमोर उलगडला
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, शिरगाव येथे 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत 'जाणूया व्यक्तिमत्त्व' हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला.
पोलिसांचे नाव काढताच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात एक अनामिक भीती असते.
मात्र, शिरगाव (ता. वाई) येथील बालगोपाळांनी या भीतीला बाजूला सारत थेट पोलीस उपअधीक्षक यांची सडेतोड आणि खुमासदार मुलाखत घेतली. 'बालपत्रकार' बनून आलेल्या या चिमुकल्यांच्या हटके आणि उत्सुकतेने भरलेल्या प्रश्नांनी पोलीस उपअधीक्षकही काही काळ चक्रावले आणि सुखावले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी भुईज पोलीस स्टेशनच्या प्रभारी परविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक पूनम झगडे यांची मुलाखत घेत शिक्षण, पोलीस सेवेतील प्रेरणा, जबाबदाऱ्या आणि आव्हाने याविषयी थेट प्रश्न विचारले. शिस्त, प्रामाणिकपणा, मेहनत आणि देशसेवेचे महत्त्व त्यांनी जाणून घेतले.
पूनम झगडे यांनी प्रत्येक प्रश्नाला मनमोकळेपणाने उत्तरे देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कर्तव्यनिष्ठा, समाजसेवा आणि जबाबदारीची जाणीव या संवादातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनंत पवार आणि शिक्षणतज्ज्ञ दिलीप भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम साकारला. मुख्याध्यापिका संगीता ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुणांना चालना मिळाली.
शिरगावच्या चिमुकल्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, "पोलीस आमचे मित्र आहेत" हा संदेश या मुलाखतीतून खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोहोचला आहे.
खाकी वर्दी मागचा माणूस मुलांसमोर उलगडलामुलांनी अगदी अनौपचारिक आणि थेट वातावरणात मुलाखतीला सुरुवात केली. एरवी गुन्हेगारांवर वचक ठेवणारे आणि कायदा-सुव्यवस्थेचा ताण सांभाळणारे पोलीस उपअधीक्षक चिमुकल्यांच्या सहवासात अगदी लहान मूल बनून रमले. मुलांच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी हसतमुखाने आणि सोप्या भाषेत उत्तरे दिली.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











