कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून मंडळांना सूचना
शिवशाही वृत्तसेवा, वाई (शुभम कोदे)
आगामी श्री गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहात पार पडावा, यासाठी वाई येथील पंचायत समितीच्या देशभक्त किसन वीर सभागृहात पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून मंडळांना विविध सूचना आणि नियम स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत बोलताना पोलीस निरीक्षक प्रदिप सूर्यवंशी म्हणाले की, गणेशोत्सव काळात सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा व अफवा पसरवू नयेत. मंडप उभारणीपासून मिरवणुकीपर्यंत सर्व आवश्यक परवानग्या वेळेत घेणे बंधनकारक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मंडपात CCTV बसवावेत. मनोरंजनासोबतच रक्तदान व आरोग्य शिबिरांसारखे सामाजिक उपक्रम राबवावेत. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे देखावे सादर करू नयेत, तसेच देखावे व मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी आणि वेळेच्या नियमांचे पालन करावे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी सांगितले की, सुरक्षेसाठी प्रत्येक मंडळासाठी एक पोलीस कर्मचारी नेमला जाणार असून तो रोज मंडळाला भेट देईल. मंडळांनी कमिटी रीतसर रजिस्टर करावी, महावितरणकडून अधिकृत तात्पुरता मीटर घ्यावा व मंडपाचे स्टेज मजबूत ठेवावे. मिरवणुकीतील वाहनांची RTO तपासणी करून घ्यावी, वाहनात स्फोटक पदार्थ नसावेत व चालक निर्व्यसनी असावा. गर्दी नियंत्रणासाठी स्वयंसेवक नेमावेत आणि पदाधिकाऱ्यांनी स्वतः मद्यपान न करता इतरांनाही त्यापासून परावृत्त करावे.
बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी देखाव्यांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी, महावितरणच्या धोकादायक तारांचा बंदोबस्त आणि नियमानुसार डॉल्बीला परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, उपस्थित नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी डॉल्बीला तीव्र विरोध दर्शवला. "हॉस्पिटल परिसरातही डॉल्बीचा मोठा आवाज ठेवला जातो, अश्लील नृत्य केले जाते. धूप-अगरबत्तीऐवजी गुटखा व दारूचा वास येतो. त्यामुळे वाईचा गणेशोत्सव पारंपारिक, सुसंस्कृत आणि शांततेतच साजरा व्हावा," अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली.
या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक प्रदिप सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य दिनकर शिंदे, महिला दक्षता समितीच्या सदस्या जागृती पोरे, ज्योती गांधी, सुधा साबळे, मंजिरी पानसे, तनुजा इनामदार, सारिका गवते यांच्यासह शहर व तालुक्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





























