रस्ता तुमच्या मालकीचा नाही - प्रशासनाचा सज्जड इशारा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (शुभम कोदे)
शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत अतिक्रमणे आणि विनापरवाना फ्लेक्स-फलकांमुळे होत असलेल्या विद्रुपीकरणाला आळा घालण्यासाठी वाई नगरपरिषदेने शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) धडक ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम राबविली. नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त नियोजनातून झालेल्या या कारवाईमुळे रस्ते, चौक आणि सार्वजनिक जागा बळकावून बसलेल्या अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले. किसनवीर चौक, गणपती आळी, भाजी मंडई, ब्राम्हणशाही, महागणपती मंदिर परिसर तसेच महामार्गाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर नगरपरिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. परवानगीशिवाय उभारण्यात आलेले फ्लेक्स, फलक आणि होर्डिंग्ज हटविण्यात आले. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्या तसेच रस्त्यावर ठेवण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले.
शहरातील प्रमुख चौक आणि बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विनापरवाना जाहिरातींचे फलक उभारण्यात आले होते. त्याचबरोबर काही दुकानदारांनी दुकानांसमोर लोखंडी जाळ्या ठेवणे, गटारावर अनधिकृत बांधकाम करणे तसेच रस्त्याच्या जागेत वाहने पार्क करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. अशा प्रकारांवरही कारवाई करण्यात आली. कारवाईपूर्वी नगरपरिषदेने संबंधितांना अनधिकृत अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. शुक्रवारी सकाळी अतिक्रमण विभागाच्या रिक्षावरील ध्वनिक्षेपकाद्वारे हातगाडे, दुकानांचे अनधिकृत बोर्ड आणि फ्लेक्स काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली.
सार्वजनिक रस्ते, चौक आणि जागा या कोणाच्याही खासगी मालमत्ता नसून त्या सर्व नागरिकांच्या वापरासाठी आहेत. त्यामुळे रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांनी किंवा परवानगीशिवाय फ्लेक्स लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांनी यापुढे नियमांचे पालन करावे, असा स्पष्ट इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे. अतिक्रमण पुन्हा केल्यास दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
शहरातील अतिक्रमण हटविताना हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्नही प्रशासनाने लक्षात घेतला आहे. पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासोबतच किरकोळ व्यवसाय करणाऱ्या नागरिकांसाठी हॉकर्स झोन निर्माण करण्याचे नियोजन असल्याचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी सांगितले. कोणाच्याही उपजीविकेवर गदा आणण्याचा उद्देश नसून, नियमानुसार व्यवसायासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाई शहरातील वाढता पार्किंगचा प्रश्न वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर वाहने उभी न करता उपलब्ध पार्किंगच्या जागेतच वाहने पार्क करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुकानासमोर किंवा रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने उभी करून मार्ग अडविणाऱ्यांवरही आगामी काळात कारवाई केली जाणार आहे. वाई हे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर असल्याने शहराचे सौंदर्य, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्था अबाधित ठेवणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता यापुढेही नियमितपणे आणि अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
नगरपरिषदेच्या या धडक कारवाईचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले असून, कारवाई सातत्याने सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाईने ‘कोणी काही करणार नाही’ या मानसिकतेत वावरणाऱ्या अतिक्रमणधारकांना चांगलाच दणका बसला आहे. नियम मोडाल तर कारवाईला सामोरे जावेच लागेल, असा स्पष्ट संदेश या मोहिमेतून वाई नगरपरिषदेने दिला आहे.
या मोहिमेत कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी, स्थापत्य नगर अभियंता व पथक प्रमुख कोमल साबळे, स्थापत्य अभियंता अनंत प्रभुणे, सहाय्यक पथक प्रमुख सर्वेश खाडे, मनोज बारटक्के, स्वच्छता निरीक्षक विजय मारोडा, चंद्रकांत अडसूळ, राहुल शिंदे, यश पवार, आदित्य कांबळे, प्रसाद पाटोळे, सागर लाड, कैलास लाड, रोहित गाढवे, राजेंद्र चौगुले, अमोल रोकडे, प्रमोद जाधव, रवींद्र काळोखे, आयुष लाड यांच्यासह आरोग्य, बांधकाम व वसुली विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
वाईला अतिक्रमणमुक्त, सुंदर आणि वाहतूक कोंडीमुक्त करू - नगराध्यक्ष अनिल सावंत
वाई शहराची ऐतिहासिक आणि पर्यटननगरी म्हणून असलेली ओळख कायम ठेवण्यासाठी शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत फ्लेक्स आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबींवर कठोरपणे कारवाई करणे गरजेचे आहे. नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने रस्ते अथवा सार्वजनिक जागा बळकावण्यास कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. मात्र, हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांच्या उपजीविकेचाही विचार करून त्यांना नियमानुसार व्यवसाय करता यावा यासाठी हॉकर्स झोनसारख्या पर्यायी व्यवस्थेचा विचार केला जात आहे.
शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडविणे, वाहतूक सुरळीत करणे आणि वाईचे सौंदर्य जपणे याला नगरपरिषदेचे प्राधान्य आहे. अतिक्रमण हटाव मोहीम कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नसून शहराच्या शिस्तीसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी आहे. ही कारवाई सातत्याने सुरू ठेवून वाईला स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
































