महाबळेश्वरात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियान कार्यशाळेत राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण, नियोजन आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर महाबळेश्वर येथे महामंथन सुरू झाले आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी तसेच ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांना अधिक गती देण्याच्या उद्देशाने आयोजित दोन दिवसीय उच्चस्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झाला.
या कार्यशाळेला राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तसेच ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित आहेत. ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची सद्यस्थिती, अंमलबजावणीतील अडचणी आणि आगामी काळातील नियोजन याबाबत या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात येत आहे.
कार्यशाळेत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाच्या जिल्हानिहाय प्रगतीचा आढावा घेण्यात आला. अभियानाची उद्दिष्टपूर्ती, अंमलबजावणीदरम्यान निर्माण होणाऱ्या प्रशासकीय अडचणी, त्यावरील उपाययोजना तसेच सन २०२६-२७ चे नियोजन यावर सखोल विचारमंथन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ‘सक्षम ग्रामपंचायत, प्रभावी प्रशासनातून समृद्ध ग्रामीण महाराष्ट्र घडवू’, असा निर्धार व्यक्त केला. ग्रामपंचायती अधिक सक्षम करणे, विविध शासकीय योजनांमध्ये प्रभावी समन्वय साधणे आणि योजनांचा लाभ तळागाळातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक पातळीवरील गरजा लक्षात घेऊन विकासकामांचे नियोजन करून त्यांना गती देण्यावर प्रशासनाने भर द्यावा, अशा सूचनाही गोरे यांनी दिल्या. ग्रामपंचायती या ग्रामीण विकासाच्या केंद्रस्थानी असल्याने त्यांची कार्यक्षमता वाढविणे आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी विभागांमध्ये अधिक चांगला समन्वय असणे गरजेचे आहे. योजनांची केवळ कागदोपत्री पूर्तता न करता त्याचा प्रत्यक्ष परिणाम गावकऱ्यांच्या जीवनमानावर दिसला पाहिजे, यावरही त्यांनी भर दिला.
सक्षम ग्रामपंचायत, प्रभावी प्रशासन आणि लोकसहभागाच्या बळावर समृद्ध व विकसित ग्रामीण महाराष्ट्र घडविणे हे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाचे प्रमुख ध्येय आहे. गावांच्या स्थानिक गरजा ओळखून विकासाचे प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि त्यानुसार विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही या अभियानाची महत्त्वाची दिशा आहे.
महाबळेश्वर येथे सुरू झालेल्या या दोन दिवसीय कार्यशाळेत राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागातून ग्रामीण विकासाच्या योजनांना अधिक परिणामकारक आणि गतिमान करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होत आहे. त्यामुळे आगामी काळात ग्रामपंचायत पातळीवरील प्रशासन अधिक सक्षम होऊन ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
































