गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि प्रेरणेची पर्वणी
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
सौ. सुशिलाताई परांजपे विद्यालय, अतिट येथे गणेशोत्सव सप्ताहाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व प्रबोधनात्मक उपक्रम उत्साहात घेण्यात आले. या सप्ताहातील प्रमुख आकर्षण ठरले ते विद्यालयातील शिक्षक महेश घाडगे सर यांनी साकारलेल्या रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची India Book of Records मध्ये नोंद झाली असून शासनाकडून त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
दि. १५ रोजी सकाळी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सायंकाळी श्री. मुकुंद संकपाळ यांचे ‘अभिमन्यू’ या विषयावर व्याख्यान झाले. महाभारतातील अभिमन्यूच्या जीवनातील प्रसंग, त्याचे शौर्य व संघर्ष यांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. दि. १६ रोजी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी व सी.ए. ऋतुजा बाळकृष्ण जाधव हिने ‘माझा सीएपर्यंतचा प्रवास’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेले परिश्रम, अभ्यासातील सातत्य, संयम आणि त्याग याबाबत तिने प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यानंतर अथर्व गायकवाड यांनी ‘करिअरच्या विविध वाटा’ या विषयावर मार्गदर्शन करताना शासकीय सेवांमधील विविध संधी, नोकरीच्या जागा तसेच त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या स्पर्धा परीक्षांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
दि. १७ रोजी माजी सैनिक रमेश बाळासाहेब जाधव यांनी ‘माझे सेवेतील अनुभव’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. आपल्या सैन्यसेवेतील विविध रोमहर्षक अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर कथन केले. दि. २१ रोजी ‘वेगळा विचार’ या विषयावर प्रा. दत्तात्रय चव्हाण यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले. महान व्यक्तींनी केलेला वेगळा विचार, त्या विचारावर शेवटपर्यंत ठाम राहण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यातून मिळालेले यश याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याच दिवशी विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दि. २२ रोजी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या गणेशमूर्तींचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सत्रात विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. दि. २३ रोजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने पिंपामध्ये विसर्जन करण्यात आले. तसेच दि. २४ रोजी विद्यालयात केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख विशाल शेटे यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.
या संपूर्ण गणेशोत्सव सप्ताहातील कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. कार्यक्रमांचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास तळेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेश घाडगे यांनी केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, आरोग्य, करिअर मार्गदर्शन, देशसेवेची प्रेरणा, इतिहासाची ओळख आणि क्रीडा संस्कार देण्याचा विद्यालयाचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आला.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











