शेंदुरजणे कॅनॉल परिसरातील कारवाईने खळबळ
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना वाई शहरासह तालुक्यात सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण असतानाच गावठी पिस्तुले बाळगून दहशत माजविणाऱ्या दोघांना वाई पोलिसांनी अटक केली. या कारवाईत १ लाख ४० हजार २५० रुपये किमतीची देशी बनावटीची दोन गावठी पिस्तुले आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईने वाई परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.
सुदेश दीपक पाटणे आणि अक्षय विलास देसाई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वाई ते सुरूर मार्गावरील शेंदुरजणे गावच्या हद्दीत कॅनॉलजवळ एक युवक हातात पिस्तुल घेऊन फिरत असून दहशत निर्माण करीत असल्याची खात्रीशीर माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलिसांनी शेंदुरजणे हद्दीतील कॅनॉल परिसरात दुपारी साडेबारा वाजल्यापासून सापळा रचला. तब्बल पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुदेश पाटणे संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर पिस्तुल स्वप्निल ऊर्फ सोन्या प्रदीप जगताप याच्याकडून घेतल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच अक्षय देसाई यानेही त्याच व्यक्तीकडून पिस्तुल घेतल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांनी अक्षय देसाईचा शोध सुरू केला. रात्री उशिरा तो परखंदी रोड चौकात पोलिसांना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता एक गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली.
या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २२ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे करीत आहेत. वाई शहर आणि तालुक्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून ठिकठिकाणी गणरायाच्या आरती, सजावटी आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. अशा उत्सवी वातावरणात पिस्तुलांसह दोघांना अटक झाल्याने या कारवाईकडे नागरिकांचे विशेष लक्ष वेधले गेले आहे. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पो. कॉ हेमंत शिंदे, पो.कॉ. सोमनाथ टिके, पो.कॉ. विक्रम धोत्रे, पो.कॉ. विशाल शिंदे, पो. कॉ.नितीन कदम, पो.कॉ. हणमंत गाडे, महिला पोलीस नाईक प्रियांका कदम यांच्या पथकाने केली.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा






























