शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई तालुक्यातील पांडेवाडी येथे बिबट्याने शेतातील राहत्या घरासमोर बांधलेल्या दोन पाळीव मेंढ्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्याची घटना शुक्रवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पांडेवाडी येथील शेतकरी शिवाजी लक्ष्मण भोसले यांच्या शेतातील राहत्या घरासमोर दोन पाळीव मेंढे बांधण्यात आले होते. दुपारी सुमारे तीनच्या सुमारास बिबट्याने अचानक या मेंढ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही मेंढ्यांचा मृत्यू झाला.
भोसले यांच्या राहत्या घराच्या शेजारी व आजूबाजूला ऊस तसेच इतर पिके आहेत. या दाट पिकांमुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळत असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्या दिसल्याची सूचना गावच्या पोलीस पाटलांनी ग्रामस्थांच्या ग्रुपवर दिली होती. त्यामुळे ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर आता थेट शेतातील घरासमोर बांधलेल्या पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत मेंढ्यांचा पंचनामा केला. परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने पाहणी करून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, तसेच शेतकरी व ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
शेतकरी व पशुपालक चिंतेतपांडेवाडी आणि लगतच्या डोंगराळ भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन घडत होते. मात्र, आता थेट वस्तीत घुसून बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केल्याने शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांचे धाबे दणाणले आहेत. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे अथवा शेतात पाणी पाजण्यासाठी जाणे अत्यंत धोक्याचे बनले आहे.
पिंजरा लावण्याची ग्रामस्थांकडून मागणी..
बिबट्याचा वावर मानवी वस्तीजवळ वाढल्याने वनविभागाने या परिसरात तातडीने बिबट्याला गनिमी काव्याने पकडण्यासाठी पिंजरा लावावा, तसेच रात्रीच्या वेळी नियमित गस्त घालावी, अशी जोरदार मागणी पांडेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे. वनविभागाने तत्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा












