सैनिक फेडरेशनचे ढेबेवाडी पोलिसांना निवेदन; कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
मराठवाडी (ता. पाटण) येथील सेवारत नौसैनिक अनिरुद्ध सुनील पवार यांच्या कुटुंबीयांना कथितरीत्या शिवीगाळ, दमदाटी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून संबंधितांवर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी सैनिक फेडरेशनच्या वतीने ढेबेवाडी पोलिसांकडे करण्यात आली आहे. याबाबत सैनिक फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी ढेबेवाडी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले. अनिरुद्ध पवार हे भारतीय नौदलात दिल्ली येथे सेवारत असून त्यांचे आई-वडील व पत्नी मराठवाडी येथे वास्तव्यास आहेत.
पवार यांनी २४ सप्टेंबर रोजी कराड येथील सैनिक कक्षात सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी तसेच जिल्हा संरक्षण समितीचे सदस्य प्रशांत कदम यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दिला. तक्रारीनुसार, वैभव किसन सुतार व किसन सुतार यांच्याकडून पवार यांच्या कुटुंबीयांना कथितरीत्या धमकी, शिवीगाळ व दमदाटी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गावातील नागरिकांना कुटुंबीयांविरोधात भडकविणे आणि सैनिकाच्या नोकरीबाबत भीती निर्माण करण्याचे प्रकार होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे पवार यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी संबंधितांना बोलावून चौकशी करावी, आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि कुटुंबीयांना संरक्षण व आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. भविष्यात कुटुंबीयांना कोणताही धोका निर्माण झाल्यास प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, माजी सैनिक कल्याण मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. यावेळी सैनिक फेडरेशनचे कराड उपाध्यक्ष सर्जेराव देसाई, निवृत्त सुभेदार एन. सी. शीबे, खटाव तालुका कार्याध्यक्ष निवृत्त सुभेदार राजकुमार शिंदे, सचिन थोरवे, कोरेगाव तालुका उपाध्यक्ष मनोज शिंदे, सेवारत नौसैनिक अनिरुद्ध पवार, त्यांचे कुटुंबीय तसेच आजी-माजी सैनिक उपस्थित होते.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











