आजोबा गणपतीच्या भेटीनंतर विसर्जन मिरवणुकीचा श्रीगणेशा, २४० मंडळांचा सहभाग

४ ते ५ हुल्लडबाज ताब्यात तर ४ ते ५ डॉल्बींवर गुन्हे दाखल
Historical Ganesh utsav, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाईच्या ऐतिहासिक आणि पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीला शुक्रवारी (दि. २५) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला; मात्र भक्ती, परंपरा आणि ढोल-ताशांच्या गजराबरोबरच रात्रीच्या सुमारास डॉल्बीच्या कर्णकर्कश दणदणाटाने ध्वनी मर्यादांच्या नियमांनाच आव्हान दिल्याचे चित्र शहरात दिसून आले. दिवसा तुलनेने नियंत्रणात असलेला ध्वनी सायंकाळनंतर मोठ्या मंडळांच्या डॉल्बींमुळे अक्षरशः कानठळ्या बसवणारा ठरला. शहरात जवळपास ५० डॉल्बी सुरू असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

शाहीर चौक, गंगापुरी येथे प्रताप मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मानाच्या गणपतीची आरती, पुष्पवृष्टी, श्रीफळ वाढविणे आणि फीत कापून विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत व त्यांच्या पत्नी सरिता सावंत यांच्या हस्ते मानाच्या गणपतीची आरती करण्यात आली. प्रांताधिकारी योगेश खरमाटे यांच्या हस्ते फीत कापण्यात आली, तर तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रताप मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवर, पत्रकार तसेच वाईच्या मानाच्या गणपतीचे पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. 

वाईच्या विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य असलेली शेकडो वर्षांची परंपरा यंदाही कायम राहिली. ब्राह्मणशाही येथून निघणारा मानाचा गणपती प्रथम गंगापुरी येथील आजोबा गणपतीची भेट घेतो आणि त्यानंतरच शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. मानाच्या गणपतीनंतर ब्राह्मणशाही येथील नवसाचा गणपतीही विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला. नवसाच्या गणपतीचा रथ संपूर्ण विसर्जन मार्गावर मंडळातील युवक आणि महिलांकडून ओढला जाणे हे यंदाही आकर्षण ठरले. त्यानंतर शहरातील विविध गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण २४० सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पार पडल्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे आणि पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये ५ पोलीस अधिकारी, ५२ पोलीस अंमलदार, ४८ होमगार्ड आणि एक एसआरपीएफ प्लाटून तैनात करण्यात आली होती.

मिरवणुकीदरम्यान गोंधळ घालणाऱ्या काही तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली. नावेचीवाडी, सिद्धनाथवाडी, रविवार पेठ आदी भागांतील काही तरुणांसह आणखी काही हुल्लडबाजांवर पोलिसांनी कारवाई केल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. मिरवणुकीत अडथळा आणणाऱ्या ४ ते ५ जणांना ताब्यात घेऊन नंतर समज देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा यंदा चांगलाच ऐरणीवर आला. किसनवीर चौकात पोलिसांचे पथक ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी यंत्रणेसह दाखल झाले होते. पोलिसांची ही यंत्रणा दिसताच काही मंडळांनी ध्वनीची तीव्रता कमी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, निर्धारित ध्वनी मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी आणि ध्वनिक्षेपक वाजविल्याप्रकरणी ४ ते ५ सार्वजनिक गणेश मंडळांच्या डॉल्बी सिस्टीमविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून इतर काही मंडळांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे वाई पोलिसांनी सांगितले.

मिरवणुकीदरम्यान एका मंडळाने डॉल्बीसाठी तब्बल अडीच लाख रुपयांचा चेक मोठ्या बॅनरवर झळकवत मिरवणूक काढल्याचे दिसून आले. डॉल्बीचा खर्च आणि त्यातून निर्माण होणारा ध्वनी याची चर्चा शहरात रंगली. ढोल-ताशा, पारंपरिक वाद्ये आणि सांस्कृतिक सादरीकरणाऐवजी अनेक ठिकाणी डॉल्बीच्या भिंती उभारल्याचे चित्र दिसल्याने ‘गणेशोत्सवाची परंपरा की ध्वनीची स्पर्धा?’ असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात होता.

शहरासह तालुक्यातील विसर्जन मिरवणुकांमधील डॉल्बी रात्री बारा वाजता बंद करण्यात आले. त्यानंतरही ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणेश विसर्जन सुरू होते. मिरवणुकीदरम्यान युवकांसह काही अल्पवयीन मुले ट्रॅक्टर व डॉल्बीच्या वाहनांवर उभे राहून धिंगाणा घालताना दिसल्याचे नागरिकांनी सांगितले. ध्वनी मर्यादा, सुरक्षितता आणि मिरवणुकीतील शिस्त या मुद्द्यांवर आता प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईला गणेशोत्सवाची समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. आजोबा गणपतीची भेट, मानाच्या गणपतीची मिरवणूक आणि पारंपरिक पद्धतीने विसर्जन हा या परंपरेचा गाभा आहे. मात्र वाढता डॉल्बीचा आवाज, ध्वनी प्रदूषण आणि मिरवणुकीतील हुल्लडबाजी यामुळे या परंपरेच्या मूळ स्वरूपावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची चर्चा शहरात होती.  परंपरेचा उत्सव हा ध्वनीच्या स्पर्धेत बदलू नये, यासाठी मंडळांनी स्वनियंत्रण आणि प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. 

वाई नगरपरिषदेच्या वतीने अखिल भाजी मंडई व्यासपीठ येथे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तसेच विसर्जन मिरवणुकीत सहभागी गणेश मंडळांचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, नगरसेवक-नगरसेविका तसेच डॉ. मकरंद पोरे, विजय पाटणे, सचिन गांधी, संग्राम पाडळे, गिरीधर मालुसरे, संतोष जमदाडे, जितेंद्र पिसाळ, निलेश मोरे, प्रविण जाधव, रुपेश जाधव, निखिल जाधव आदी उपस्थित होते. 

दरम्यान, सकाळपासूनच घरगुती गणेश विसर्जनासाठी नागरिकांची लगबग सुरू होती. कृष्णा नदीपात्रात पाणी कमी असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर वाई नगरपरिषद, दिशा अकॅडमी, किसनवीर कॉलेजचे एनसीसी पथक आणि धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने गणेशमूर्ती दानाचा उपक्रम राबविण्यात आला. या आवाहनाला वाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ३८०० गणेशमूर्ती दान केल्या. वाई नगरपरिषदेने धोम कॉलनी येथे कृत्रिम हौदाची व्यवस्था केली होती. जमा झालेल्या मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. 

नगरपरिषदेचे कर्मचारी, किसनवीर कॉलेजचे एनसीसी पथक आणि दिशा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम शिस्तबद्ध पद्धतीने राबविला. भक्ती, परंपरा आणि उत्साहाने गणरायाला निरोप देताना वाईकरांनी पुढच्या वर्षी लवकर येण्याची प्रार्थना केली; मात्र यंदाच्या विसर्जन मिरवणुकीने ‘परंपरा जपूया, पण ध्वनीचा अतिरेक थांबवूया’ हा प्रश्नही शहरासमोर ठळकपणे उभा केला आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !