आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या 2026 मधील द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान, तर 27 ऑक्टोबर 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कासेकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी कासेकर यांनी निवडणूक कार्यक्रम, मतदारसंघाची रचना, मतदार यादी, मतदान केंद्रे तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
विभागीय आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी, तर जिल्हाधिकारी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. याशिवाय 11 उपजिल्हाधिकारी आणि 12 तहसीलदार अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक प्रक्रियेतील विविध जबाबदाऱ्या सांभाळणार असल्याची माहिती कासेकर यांनी दिली.
मतदारसंख्येत वाढ, अंतिम यादी 4 ऑक्टोबरला
दि. 25 सप्टेंबर 2026 रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 40 हजार 17, तर शिक्षक मतदारसंघासाठी 13 हजार 728 मतदार नोंदणीकृत आहेत.
दरम्यान, मतदार नोंदणी प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, 26 सप्टेंबरपर्यंत पदवीधर मतदारसंघासाठी 9 हजार 960, तर शिक्षक मतदारसंघासाठी 1 हजार 485 अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादीत मतदारसंख्येत वाढ होणार आहे.
सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात 109 मतदान केंद्रे, तर शिक्षक मतदारसंघासाठी 71 मतदान केंद्रे आहेत. नव्याने नोंद झालेल्या मतदारांच्या संख्येनुसार मतदान केंद्रांच्या संख्येतही बदल होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
अंतिम मतदार यादी 4 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, ती सर्व संबंधित राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्याचे आवाहन
निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्व राजकीय पक्षांनी भारत निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कासेकर यांनी केले.
निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाला सर्व राजकीय पक्षांनी आवश्यक सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी, मतदान केंद्रे आणि इतर आवश्यक प्रशासकीय तयारीला वेग आला असून, 4 ऑक्टोबरच्या अंतिम मतदार यादीकडे राजकीय पक्षांसह प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











