स्थानिक ग्रामस्थ अन् संस्थांच्या पुढाकाराने पेटवला अग्नी
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (अनिल सूर्यवंशी)
वैजापूर तालुक्यातील सफियाबाद वाडी येथे स्थानिक ग्रामस्थ, तरुण मंडळ आणि सामाजिक-धार्मिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वीरीत्या राबवण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून या प्रयोगाची जोरदार तयारी सुरू होती. गावकऱ्यांनी एकत्र येत केलेल्या या अनोख्या प्रयत्नाचे संपूर्ण वैजापूर तालुक्यातून विशेष कौतुक होत आहे.
या प्रयोगासाठी सफियाबाद वाडी येथील डोंगराळ भागातील ५ झाडे, वाळलेले ३ ट्रॅक्टर लाकूड, १२ ट्रॅक्टर ओले लाकूड आणि तब्बल ५ क्विंटल मिठ असे साहित्य वापरले. संपूर्ण साहित्य एकत्र करून शास्त्रोक्त पद्धतीने अग्नी पेटवून या प्रयोगाचा शुभारंभ करण्यात आला.
श्री संत शिवाई संस्थांचे अध्यक्ष पंढरीनाथ महाराज पगार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या प्रयोगाचा प्रारंभ झाला. यावेळी संत शंकर स्वामी संस्थांचे उपाध्यक्ष सारंगधर भोपळे महाराज, शास्त्री पवन पाठक गुरुजी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील (पैठण) पगारे, उपसभापती बाळा जाधव, तसेच सिंहनाद प्रतिष्ठानचे उपसरपंच अनिल भोसले यांनी विशेष पुढाकार घेतला.
या प्रसंगी गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि तरुण मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने रामभाऊ जाधव, संजू जाधव, उत्तम जाधव, मिनीनाथ जाधव, भाऊसाहेब जाधव, गणेश नरोडे, संतोष जाधव, बापू निकम, सोन्या देशमुख, दत्तू जाधव, अभीगिरी निकम, जालिंदर निकम, प्रभाकर दारवंटे, विशाल दारवंटे, माजी सरपंच बाबासाहेब राऊत आणि अशोक जाधव यांच्यासह सफियाबाद वाडीतील सर्व ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने हजर होता.
सफियाबाद वाडीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, "पर्जन्यवृष्टीसाठी आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक गावाने अशा प्रकारचे प्रयोग करून निसर्गाला साद घालावी," असे आवाहन सफियाबाद वाडीतील गावकऱ्यांनी यावेळी केले आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











