ज्ञानमंदिराचे शिल्पकार रमेश जाधव सर सेवानिवृत्त

कोंढवलीत उपक्रमांची अन् संस्कारांची मोठी शिदोरी!
Teacher, headmaster Ramesh Jadhav retire, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - काही माणसे आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या ध्येयनिष्ठ कार्याने कायमची आठवण ठेवून जातात. अशाच ऋणानुबंध जपणार्‍या व्यक्तिमत्त्वांमध्ये मुख्याध्यापक रमेश जाधव सरांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास म्हणजे समर्पण, जिद्द आणि सेवाभावाची एक प्रदीर्घ वाटचाल ठरला आहे. 

परतवडीच्या भूमीत जन्माला आलेल्या जाधव सरांनी वाई नगरपालिका शाळा क्र. ७ येथून आपल्या सेवाप्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर धावडवाडी (ता. खंडाळा), शहाबाग, नांदगणे, अभेपुरी, एकसर, चिखली अशा विविध शाळांतून सेवा बजावत अखेरीस जिल्हा परिषद आदर्श शाळा, कोंढवली येथे त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. शाळा बदलल्या, विद्यार्थी बदलले; मात्र शिक्षणाविषयीची त्यांची आंतरिक तळमळ कायम राहिली. परतवडी ही त्यांची जन्मभूमी, तर वीर जीवाजी महाले यांच्या शौर्यपरंपरेची आठवण जपणारी कोंढवलीची भूमी त्यांची खरी कर्मभूमी ठरली. 

मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासोबतच नेहमी विद्यार्थीहिताला प्राधान्य दिले. त्यांच्या अथक प्रयत्नांतून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून कोंढवली शाळेला सुमारे एक कोटी रुपयांची भव्य वास्तू प्राप्त झाली. ज्या भूमीला शौर्याचा वारसा लाभला आहे, त्याच भूमीवर ज्ञानाचा भव्य वारसा उभा करण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी केले.

आपल्या संपूर्ण सेवाकाळात त्यांनी केवळ पुस्तकातील धडे शिकवले नाहीत, तर विद्यार्थ्यांना संस्कार, माणुसकी आणि जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, वकील, शिक्षक, अभियंते आणि आयटी क्षेत्रासह विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांचे हे यश हीच सरांच्या कार्याची खरी पावती आहे. 

अध्यापनासोबतच वाई तालुक्यातील, विशेषतः पश्चिम भागातील गरजू विद्यार्थ्यांना विविध संस्था व दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी ते शाळेच्या वेळेनंतरही तत्परतेने उपलब्ध राहत असत. या प्रदीर्घ सामाजिक अन् शैक्षणिक प्रवासात त्यांच्या पत्नी, दोन मुले आणि भावाने त्यांना नेहमीच खंबीर साथ दिली.

सरांच्या बोलण्यात नेहमीच गोडवा, वागण्यात नम्रता आणि स्वभावात संयम जाणवतो. ‘तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ’ या उक्तीचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक कृतीतून येतो. पद, अनुभव किंवा अफाट कर्तृत्वाचा अहंकार न बाळगता प्रत्येकाला सोबत घेऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले.

जरी आज त्यांच्या औपचारिक सेवेला विराम मिळत असला, तरी कोंढवलीच्या ज्ञानमंदिरात आणि हजारो विद्यार्थ्यांच्या हृदयात त्यांच्या कर्तृत्वाची पाऊलखूण सदैव कायम राहील. अशा ऋषितुल्य शिक्षकाच्या समर्पित सेवापर्वाला सर्व स्तरातून कृतज्ञतेचा सलाम केला जात आहे!
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !