शेंगा भरण्याच्या टप्प्यात पीक करपण्यास सुरुवात; पंचनामे करून मदतीची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत. पेरणीपासून खते, मशागत आणि कोळपणीसाठी मोठा खर्च करूनही शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे पीक सुकू लागले असून, शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
तालुक्यातील विविध भागांत सोयाबीनला शेंगा लागल्या असल्या, तरी गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे. सध्या सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरण्याचा काळ सुरू असून, या काळात पिकाला मुबलक पाण्याची नितांत गरज असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
सोयाबीनच्या पेरणीसाठी बियाणे, खते आणि मजुरीवर शेतकऱ्यांनी हजारो रुपयांचा खर्च केला आहे. आता पाऊस पडल्यास शेंगा भरून उत्पादनात काही प्रमाणात मदत होऊ शकते; परंतु पाऊस असाच लांबल्यास उत्पन्नात प्रचंड घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. सोयाबीन व्यतिरिक्त इतर खरीप पिकांचीही अशीच अवस्था झाली असून, संपूर्ण तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी!"वाई तालुक्यात पावसाअभावी सोयाबीन पिकाची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. शेंगा भरण्याच्या काळात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. प्रशासनाने तातडीने पीक पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळवून द्यावी."- सौ. सविता थोरवे(उपसरपंच, व्याहळी)
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











