लेझीम-डंबेल्सच्या तालावर विद्यार्थ्यांचा दिमाखदार सहभाग - मुसळधार पावसातही मिरवणुकीचा उत्साह कायम
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
माळशिरस - शिक्षणाची ज्योत घराघरात पोहोचवून सामान्य, वंचित आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त शिंदेवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. लेझीमचा ताल, डंबेल्सचे शिस्तबद्ध प्रात्यक्षिक, हलगीचा दणदणाट आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शिंदेवाडी परिसर कर्मवीरांच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
मिरवणुकीच्या प्रारंभी ग्रामस्थांच्या हस्ते कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले.
या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले ते हनुमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिंदेवाडीच्या विद्यार्थ्यांचे लेझीम व डंबेल्सचे सादरीकरण. पारंपरिक वेशभूषेत सजलेले विद्यार्थी, हातातील लेझीम, तालबद्ध पावले आणि चेहऱ्यावरचा उत्साह यामुळे मिरवणुकीला आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक लेझीम नृत्याला उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या डंबेल्सच्या आकर्षक, शिस्तबद्ध आणि समन्वयपूर्ण प्रात्यक्षिकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शिस्त आणि उत्कृष्ट समन्वय पाहून उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.
पावसातही थांबला नाही उत्साह!
मिरवणूक उत्साहात सुरू असतानाच अचानक वरुणराजाने हजेरी लावली. मुसळधार पावसाच्या सरी कोसळू लागल्या; मात्र कर्मवीर जयंतीचा उत्साह यामुळे किंचितही कमी झाला नाही. उलट पाऊस वाढला आणि जल्लोषही वाढला!
हलगीचा कडकडाट सुरू होताच विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी पावसातच ठेका धरला. पावसाच्या सरी, हलगीचा दणदणाट, लेझीमचा ताल आणि विद्यार्थ्यांचा भन्नाट उत्साह यामुळे मिरवणुकीतील वातावरण आणखी भारावून गेले. पावसाची तमा न बाळगता सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हा क्षण मिरवणुकीचा सर्वाधिक अविस्मरणीय ठरला.
जणू वरुणराजानेही कर्मवीर अण्णांच्या जयंतीच्या उत्सवाला आपली सलामी दिली, असा अनुभव यावेळी उपस्थितांना आला.
विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांची साथ आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे शिंदेवाडीतील कर्मवीर जयंतीची मिरवणूक उत्साह, शिस्त, संस्कृती आणि कर्मवीरांच्या विचारांना अभिवादन करणारी अविस्मरणीय मिरवणूक ठरली. या कार्यक्रमाचे विशेष नियोजन विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मिताली देठे तसेच सर्व शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य दिलीप रणवरे, लतेश शिंदे, वीरेंद्र शिंदे, चंद्रकांत शिंदे, संतोष देशमुख, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित घाडगे, उपाध्यक्ष सुनील देशमुख, तसेच ज्ञानेश्वर जगदाळे, अमोल घाडगे, राहुल तनपुरे,छगनराव रुपनवर, दीपक घाडगे, संतोष साळुंखे, झेंडे सर यांच्यासह समस्त माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे,’ हा कर्मवीर अण्णांचा विचार आजही समाजाला प्रेरणा देत आहे. त्याच विचारांना अभिवादन करत शिंदेवाडीने लेझीमच्या तालावर, डंबेल्सच्या नादावर आणि हलगीच्या कडकडाटात कर्मवीर अण्णांची १३९वी जयंती उत्साहात साजरी केली.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











