फुलांचा हा बहर अनुभवण्यासाठी निसर्गप्रेमी, छायाचित्रकार तसेच शिवप्रेमींची पावले रायरेश्वरकडे वळू लागली आहेत.
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील रायरेश्वर पठार सध्या रंगीबेरंगी रानफुलांनी बहरून गेले असून, संपूर्ण पठारावर निसर्गाने जणू फुलांची चादरच अंथरली आहे. सप्टेंबर महिन्यात फुलणाऱ्या विविध जातींच्या रानफुलांमुळे रायरेश्वरच्या सौंदर्यात मोठी भर पडली असून, साताऱ्यातील कास पठाराची आठवण करून देणारा हा निसर्गोत्सव पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रायरेश्वर पठारावर तेरडा, मिकी माऊस, सोनकी यांसह विविध जातींची रानफुले फुलली आहेत. पावसाळ्यानंतर हिरवाईच्या पार्श्वभूमीवर उमललेल्या या फुलांमुळे पठाराचे रूप अधिकच खुलले आहे. फुलांचा हा बहर अनुभवण्यासाठी निसर्गप्रेमी, छायाचित्रकार तसेच शिवप्रेमींची पावले रायरेश्वरकडे वळू लागली आहेत.
रायरेश्वरचे वैशिष्ट्य केवळ निसर्गसौंदर्यापुरते मर्यादित नसून, इतिहास, अध्यात्म आणि सह्याद्रीचे भव्य रूप यांचा अनोखा संगम येथे पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्याचे ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या भूमीवर रायरेश्वर मंदिरासह पांडवकालीन लेणी, जननी देवी मंदिर, सात रंगांची माती असलेली विहीर, गोमुखकुंड, शिवकालीन पाण्याची टाकी आणि नाकिंदा (अस्वलखिंड) अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
पठारावरून पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर या परिसरातील डोंगररांगा व किल्ल्यांचे विहंगम दर्शन घडते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथील निसर्गसौंदर्य आणखी खुलून दिसते.
रायरेश्वर, केंजळगड आणि कमळगड हे वाईच्या पश्चिम भागातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे गड आहेत. या तिन्ही गडांचा पर्यटन सर्किट म्हणून विकास झाल्यास पश्चिम भागातील पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते. वाईमार्गे रायरेश्वरच्या पायथ्यापर्यंत वाहनाने जाता येते आणि तेथून साधारण २० ते ३० मिनिटांच्या चढाईनंतर पठारावर पोहोचता येते.
रायरेश्वर परिसरात सुमारे ५०० लोकसंख्या असून, त्यापैकी सध्या सुमारे १५० नागरिक येथे वास्तव्यास आहेत. जंगम समाजाची सुमारे ४० कुटुंबे येथे आहेत, तर रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबे बाहेरगावी स्थलांतरित झाली आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा, स्थानिक मार्गदर्शक, होमस्टे, खाद्यपदार्थ व स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.
“वाईच्या पश्चिम भागात रायरेश्वर, कमळगड आणि केंजळगड अशी ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न पर्यटनस्थळे आहेत. रायरेश्वरवर सप्टेंबर महिन्यात फुलणाऱ्या रानफुलांचा बहर पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरू शकतो. गडावरील रायरेश्वर मंदिर, लेणी, सात रंगांच्या मातीची विहीर यांसह अनेक ऐतिहासिक आणि नैसर्गिक ठेवे जतन करण्याची गरज आहे. या परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करून पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटन वाढण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.”
— डॉ. अजय पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ व पर्यावरणप्रेमी, वाई पर्यटन विकासाची गरज
रायरेश्वरचा फुलांचा बहर हा केवळ हंगामी निसर्गसोहळा न राहता, स्थानिक पर्यटनाच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. स्वच्छता, पिण्याचे पाणी, दिशादर्शक फलक, सुरक्षित पायवाटा, स्थानिक मार्गदर्शक, पार्किंग आणि पर्यावरणपूरक पर्यटन सुविधा उपलब्ध झाल्यास रायरेश्वरसह केंजळगड-कमळगड पर्यटन सर्किट विकसित करण्यास मोठी मदत होऊ शकते.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











