पहिल्या दोन दिवसांत २५ अर्जांनंतर आजही उमेदवारी अर्जांचा धडाका, ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबरला अर्ज दाखल करण्याची संधी
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी आता वेग घेऊ लागली आहे. उमेदवारी अर्जांच्या विक्रीसह नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेलाही वेग आला असून, आज मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर) आणखी ४३ अर्जांची विक्री झाली. त्यामुळे आतापर्यंत विक्री झालेल्या अर्जांची एकूण संख्या ४०० वर पोहोचली आहे. आज २१ उमेदवारांनी एकूण २७ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. पहिल्या दोन दिवसांत २२ उमेदवारांचे २५ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती.
आज दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांमध्ये विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष सातारा तालुका मतदारसंघातून बाबासाहेब शिवाजी कदम, महाबळेश्वर तालुक्यातून रूपाली राजेंद्र राजपुरे (२ अर्ज) व राजेंद्र निवृत्ती राजपुरे, तर खटाव तालुक्यातून इंदिरा प्रभाकर घार्गे (२ अर्ज), प्रभाकर देवबा घार्गे (२ अर्ज) आणि धनंजय गोरखनाथ चव्हाण यांनी अर्ज दाखल केले.
गृह निर्माण व दूध संस्था मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विजाभज राखीव प्रवर्गातून सुनील सुरेश वाघ व रणजित सुरेश जाधव, तर इतर मागास वर्ग राखीव प्रवर्गातून प्रदीप बापूसो विधाते, प्रतीक प्रदीप विधाते, योगेश संभाजीराव फडतरे व सुरेंद्र मोहनराव गुदगे यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
नागरी बँका, नागरी सहकारी पतपेढ्या, ग्रामीण बिगरशेती संस्था व पगारदार नोकरांच्या पतसंस्था मतदारसंघातून रामराव आनंदराव लेंभे (२ अर्ज) व मनोहर वसंतराव बर्गे यांनी अर्ज दाखल केले. महिला राखीव प्रवर्गातून मोनल संजय साळुंखे (२ अर्ज) व राजेश्वरी रणजितसिंह देशमुख, औद्योगिक व मजूर मतदारसंघातून सुनील सुरेश वाघ, अनिल शिवाजीराव देसाई (२ अर्ज) व महेंद्र अरुण देसाई, तर कृषी प्रक्रिया संस्था मतदारसंघातून राजेंद्र मुगुटराव भोईटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
दरम्यान, नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी आता ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर हे दोन दिवस शिल्लक आहेत. या दोन्ही दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी केवळ उमेदवार किंवा सूचक यांनीच नामनिर्देशनपत्र दाखल करावे. इतर समर्थक व सोबत्यांनी निवडणूक कार्यालयात प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमुख राजकीय पक्ष, सहकार क्षेत्रातील दिग्गज आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी आपले शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याने निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.
अर्ज भरण्याच्या उर्वरित दोन दिवसांत आणखी किती उमेदवार रिंगणात उतरतात आणि कोणत्या मतदारसंघांतून किती अर्ज दाखल होतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











