गेले काही महिने संवाद बंद; जिल्हा बँकेच्या निवडणुकीने पुन्हा जुळवले राजकीय धागे
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
राजकारणात कायमस्वरूपी शत्रुत्व नसते आणि कायमस्वरूपी मैत्रीही नसते, असे म्हटले जाते. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या राजकीय समीकरणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. गेले काही महिने राजकीय अंतर राहिलेले मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मंत्री मकरंद पाटील अखेर रविवारी एकाच टेबलावर आले. जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढवता येईल का, याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची शक्यता, मित्रपक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा आणि महायुती एकत्र राहणार की स्वतंत्र पॅनल उभे राहणार, यावरून तर्क-वितर्क सुरू होते. मात्र, या सर्व चर्चांना रविवारी अचानक वेगळे वळण मिळाले.
भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण बाजूला ठेवण्याची भूमिका मांडल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही भाजपच्या संभाव्य भूमिकेबाबत संकेत दिल्याने महायुतीच्या अंतर्गत समीकरणांवर चर्चा रंगली.
शनिवारी भाजपच्या प्रमुख नेत्यांची प्राथमिक चर्चा झाल्यानंतर मित्रपक्षांशी संवाद साधण्याची जबाबदारी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे समजते. त्यानंतर रविवारी मंत्री शिवेंद्रसिंहराजे आणि मकरंद पाटील यांची भेट झाली. या भेटीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेतील राजकीय घडामोडींनंतर दोन्ही नेत्यांमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघे पुन्हा एकत्र येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
रविवारी झालेल्या चर्चेत महायुती म्हणून एकत्रितपणे पुढे जायचे असल्यास कोणत्या बाबींचा विचार करावा लागेल, मित्रपक्षांशी चर्चा कशी करायची, संभाव्य जागावाटप कसे असू शकते, यावर प्राथमिक विचारविनिमय झाल्याचे समजते. मात्र, ही चर्चा म्हणजे अंतिम राजकीय समझोता झाला, असा अर्थ काढणे घाईचे ठरणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ संचालक जागांसाठी राजकीय रस्सीखेच होणार आहे. नेत्यांच्या पातळीवर समझोता झाला तरी स्थानिक पातळीवरील इच्छुक, कार्यकर्ते आणि विद्यमान राजकीय समीकरणे हा मोठा अडथळा ठरू शकतो.
उमेदवारी, जागावाटप, मतदारसंघनिहाय समीकरणे आणि स्थानिक पातळीवरील दावेदार यामुळे पुढील काही दिवसांत खरे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे रविवारी झालेली भेट ही केवळ संवादाची सुरुवात आहे की महायुतीच्या संयुक्त पॅनलची नांदी, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दोन्ही नेते एकत्र बसल्यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या शक्यतेचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महायुतीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढविण्याबरोबरच सर्व जागांवर सामंजस्याने उमेदवार ठरवून निवडणूक बिनविरोध करण्याचा पर्याय पुढे येतोय का, याबाबतही तर्क-वितर्क सुरू आहेत.
पॅनल नको... प्रचार नको... खर्च नको... थेट बिनविरोध?
हा फॉर्म्युला प्रत्यक्षात येतो का, हे मात्र आगामी चर्चांनंतरच स्पष्ट होणार आहे.
सध्या एवढे मात्र निश्चित—गेले काही महिने राजकीय अंतरावर असलेले ‘बाबा-आबा’ जिल्हा बँकेच्या निमित्ताने पुन्हा एकाच टेबलावर आले आहेत. आता पुढचा डाव काय, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
तुम्ही एकत्र बसलात... चर्चा केलीत...आता काय ठरलं ते आमच्या पण कानात सांगा!
महायुती? संयुक्त पॅनल? की थेट बिनविरोध?
नेत्यांचा निर्णय काहीही असो, कार्यकर्त्यांना मात्र पुढच्या राजकीय ट्विस्टची उत्सुकता लागली आहे!
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











