मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूलच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा
शिवशाही वृत्तसेवा, छ.संभाजीनगर (मनोज चव्हाण)
पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई संचलित मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल, सिडको एन-७ येथील इयत्ता नववीत शिक्षण घेणारा विद्यार्थी सविधान सुमेध निकाळजे याची हँडबॉल या क्रीडा प्रकारासाठी क्रीडा प्रबोधिनी, नागपूर येथे निवड झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा कौशल्य चाचणीत सविधानने आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. त्याच्या खेळातील गुणवत्ता, कौशल्य आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्याची हँडबॉलसाठी क्रीडा प्रबोधिनी, नागपूर येथे निवड करण्यात आली.
सविधानच्या या यशाबद्दल मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या वतीने त्याचा तसेच त्याचे वडील श्री. सुमेध निकाळजे आणि आई सौ. वर्षा निकाळजे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा शिक्षक श्री. आर. एम. दिवेकर, शिक्षक श्री. एस. आर. चव्हाण, श्री. बी. के. गडहीरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. एस. जे. पांडे, श्री. डी. व्ही. म्हस्के, श्री. एस. आर. देहरे उपस्थित होते. उपस्थितांनी सविधानच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सविधानच्या या क्रीडा यशामागे त्याचे हँडबॉल प्रशिक्षक सुयश साळवे, सचिव प्रा. सत्यजित पगारे तसेच अमित प्रधान आणि निखिल म्हस्के यांचे मार्गदर्शन व योगदान लाभले आहे. सविधानच्या निवडीमुळे मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाची भर पडली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळा, शिक्षकवृंद, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून अभिनंदन करण्यात येत असून, सविधानने आगामी काळातही आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर शाळेचे आणि शहराचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











