शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)
सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांची प्रशासकीय सोय आणि महसूल कामांची गतिमानता लक्षात घेऊन पंढरपूर येथे नवीन 'अपर जिल्हाधिकारी कार्यालय' (Additional Collector Office) कार्यान्वित करण्यास राज्य शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. २२ सप्टेंबर २०२६ रोजी महसूल व वन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने केलेल्या प्रभावी पाठपुराव्याला या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे.
सात तालुक्यांतील नागरिकांना मोठा दिलासा
सोलापूर जिल्ह्याचा अथांग भौगोलिक विस्तार, वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण लक्षात घेता, जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेल्या तालुक्यांतील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी वारंवार सोलापूरला चकरा माराव्या लागत होत्या. ही गैरसोय दूर करून शासन-प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या हेतूने पंढरपूर येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे आहेत ते सात तालुके
नवीन रचनेनुसार सोलापूर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र दोन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये विभागण्यात आले आहे:
अपर जिल्हाधिकारी कार्यालय, पंढरपूर (एकूण ७ तालुके):
पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला आणि मोहोळ.
अपर जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर (एकूण ४ तालुके):
उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी आणि अक्कलकोट.
प्रशासकीय रचना आणि पुढील कार्यवाही
शासन निर्णयानुसार या नवीन कार्यालयाची प्रशासकीय प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत:
अधिकारी व कर्मचारी नियुक्ती: पंढरपूर कार्यालयासाठी अपर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांची पदस्थापना शासन स्तरावरून केली जाणार असून, इतर आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोय उपलब्ध कर्मचाऱ्यांमधून जिल्हाधिकारी सोलापूर स्तरावर करतील.
कार्यालयाची जागा: सुरुवातीला हे कार्यालय तात्पुरत्या जागेत सुरू केले जाईल. त्यानंतर कायमस्वरूपी जागेचा शोध घेऊन नव्या इमारतीचा प्रस्ताव शासनाला पाठवला जाईल.
अहवाल मुदत: या सर्व प्राथमिक प्रक्रियांची पूर्तता करून १५ दिवसांच्या आत शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे, त्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होईल.
प्रशासकीय नियंत्रण: पंढरपूर अपर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, सोलापूर तर नियंत्रक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त, पुणे हे काम पाहतील.
नेत्यांचे आभार आणि प्रतिक्रिया
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे महसूल सचिव विकास खारगे यांची भेट घेऊन या शासन निर्णयाबाबत तात्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती केली होती. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे विशेष आभार मानले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे धार्मिक व प्रशासकीय केंद्र असलेल्या पंढरपूरमध्ये हे कार्यालय सुरू झाल्याने, या क्षेत्रातील सात तालुक्यांतील शेतकरी, नागरिक आणि व्यावसायिकांना सोलापूरला न जाता पंढरपुरातच जिल्हास्तरीय महसूल सेवा उपलब्ध होणार आहेत.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











