चार दिवस विविध कार्यक्रमांना पंचक्रोशीचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - वेलंगउंबरवाडी गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव, आरती आणि मिरवणूक नव्हे, तर समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन लोकहिताचे उपक्रम राबविण्याची एक मोठी संधी आहे, हे वेलंग-उंबरवाडी येथील उंबरजाई गणेशोत्सव मंडळाने आपल्या विविध सामाजिक उपक्रमांतून दाखवून दिले. गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, मोफत नेत्र तपासणी, मोफत औषध वाटप, महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’, महसूल विभागाच्या माध्यमातून पीक पाहणी तसेच सलग चार दिवस महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांना पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गणेशोत्सवाच्या काळात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत आरोग्यविषयक उपक्रमांचे कौतुक केले. विशेष म्हणजे शिबिराच्या निमित्ताने त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक व पाणी पाहणीही केली. यावेळी मंडलाधिकारी श्रीकांत धनवडे, तलाठी व महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते रक्तदान शिबिराचे उद्घाटन विभागीय पोलीस अधिकारी (DYSP) सुनील साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. बालाजी ब्लड बँक, सातारा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिक व तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या भावनेतून अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली.
या गणेशोत्सवाच्या निमित्ताने वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, API प्रदीप जाधव, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम झगडे-शिंदे, भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, तसेच विविध शासकीय अधिकारी व मान्यवरांनी मंडळाला भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला आरोग्याच्या दृष्टीनेही मंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. वरद ICU सेंटर, श्रीशा फाउंडेशन व वरद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी तसेच मोठ्या प्रमाणात औषधांचे वाटप करण्यात आले. नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या समस्या तपासून घेण्याची आणि आवश्यक औषधोपचार मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.तसेच श्रीकृष्ण फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि डोळ्यांच्या मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यसेवा त्यांच्या गावाच्या जवळ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी विशेष कौतुक केले.
महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांच्या कलागुणांना वाव देतानाच गणेशोत्सवाच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घेण्याचा मंडळाचा हा प्रयत्न विशेष ठरला.या उत्सवाच्या काळात जिल्हा परिषद सदस्य लोकनेते बापूसाहेब शिंदे, पंचायत समिती सभापती विक्रांत उर्फ भैय्या डोंगरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणाताई पिसाळ, दीप्तीताई पिसाळ, पंचायत समिती सदस्य स्वप्निल भाई गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उंबरजाई गणेशोत्सव मंडळास भेट देऊन कार्यकर्त्यांचे कौतुक केले व त्यांचा उत्साह वाढविला.दरम्यान, महसूल विभागाच्या माध्यमातून पीक पाहणी व पीक-पाणी योजनेचा उपक्रम राबविण्यात आला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे प्रत्यक्ष पाहणी करण्यात आल्याने गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली.
गणेशोत्सवाच्या चारही दिवसांत मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यामुळे उंबरजाई गणेशोत्सव मंडळाचा परिसर चार दिवस भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीच्या वातावरणाने भारावून गेला उत्सवातून समाजसेवेचा संदेश गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक कार्यक्रम न करता ‘गणरायाच्या चरणी समाजसेवेची वाट’ या भावनेने विविध लोकहिताचे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न उंबरजाई गणेशोत्सव मंडळाने केला. आरोग्य, रक्तदान, नेत्र तपासणी, महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम, शेतकऱ्यांची पीक पाहणी आणि महाप्रसाद अशा विविध उपक्रमांमुळे हा गणेशोत्सव पंचक्रोशीत लक्षवेधी ठरला पंचक्रोशीतील नागरिकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढला असून, ‘गणेशोत्सव हा आनंदाचा उत्सव असण्याबरोबरच समाजसेवेचा उत्सवही ठरू शकतो’, याचा आदर्श उंबरजाई गणेशोत्सव मंडळाने घालून दिला आहे. नागरिकांचे प्रेम, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांची एकजूट यामुळे यंदाचा गणेशोत्सव कायमस्वरूपी आठवणीत राहणारा ठरला.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











