ई-पीक पाहणीसाठी महसूल प्रशासनाची विशेष मोहीम; ७/१२ वरील नोंद वेळेत पूर्ण करण्याचे तहसीलदारांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा,सिंदखेड राजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची अचूक नोंद स्वतः मोबाईलद्वारे करावी, या उद्देशाने महसूल विभागाच्या वतीने सिंदखेड राजा शिवारात विशेष ई-पीक पाहणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत तहसीलदारांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सिंदखेड राजा शिवारातील एका सोयाबीनच्या शेतात २३ सप्टेंबर रोजी तहसीलदार अजित दिवटे, मंडळाधिकारी सुनील टेकाळे आणि तलाठी राहुल देशमुख यांनी संयुक्तपणे भेट दिली. यावेळी तहसीलदार दिवटे यांनी मोबाईल अॅपद्वारे पिकाची अचूक नोंद कशी करावी, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार अजित दिवटे म्हणाले, "ई-पीक पाहणी ही पीक विमा, पीक कर्ज आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मिळणाऱ्या नुकसान भरपाईसाठी अत्यंत महत्त्वाची व आवश्यक बाब आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या ७/१२ उताऱ्यावरील पिकाची नोंद मोबाईल अॅपद्वारे विहित वेळेत पूर्ण करावी."
तहसीलदारांच्या महत्त्वाच्या सूचना:
- अॅपचा वापर: ७/१२ वरील पिकांची नोंद मोबाईल अॅपद्वारे ७२ तासांच्या आत पूर्ण करावी.
- स्पष्ट फोटो: अॅपमध्ये फोटो अपलोड करताना पिकाच्या फोटोसोबत स्वतःचा फोटो आणि चारही दिशांचे स्पष्ट फोटो अपलोड करावेत.
- अडचणींचे निरसन: पाहणीदरम्यान मंडळाधिकारी सुनील टेकाळे आणि तलाठी राहुल देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करत अॅप वापरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ सोडवून दिल्या.
तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार अजित दिवटे यांनी शेवटी केले.
----------------
----------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











