अहोरात्र सेवेतील पोलिसांचा गौरव - शिरूरमधील उपक्रमाची महाराष्ट्रभर चर्चा!
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (फैजल पठाण)सण-उत्सव असोत, राजकीय सभा असोत वा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती... संपूर्ण समाज जेव्हा उत्सव आणि आनंद साजरा करण्यात मग्न असतो, तेव्हा स्वतःच्या कुटुंबाला बाजूला ठेवून, ऊन, वारा आणि पावसाची कोणतीही तमा न बाळगता रस्त्यावर पहारा देणारा एकच घटक असतो... तो म्हणजे आपले पोलीस बांधव! नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या आणि कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या या 'खाकी वर्दी'तील रक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे काम शिरूरकर फाउंडेशन गेल्या तब्बल अठरा वर्षांपासून सातत्याने करत आहे.
कोणत्याही सामाजिक अथवा धार्मिक कार्यक्रमामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांच्या आनंदोत्सवाला कुठेही गालबोट लागू नये, यासाठी पोलीस प्रशासन दिवस-रात्र परिश्रम घेत असते. या सेवाभावी वृत्तीची आणि त्यागाची दखल घेऊन 'शिरूरकर फाउंडेशन'च्या वतीने दरवर्षी विशेष सन्मान उपक्रम राबवला जातो. सामाजिक बांधिलकी जपणार्या या अनोख्या उपक्रमाचे आज राज्यभरातून कौतुक होत आहे.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सक्रिय सहभाग
शिरूरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बापू सानप यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गेली १८ वर्षे अविरत सुरू आहे. या सामाजिक आणि कृतज्ञता सोहळ्यात विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.
या उपक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महीबूब सय्यद, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल तात्या बांडे, उद्योजक राजेंद्रजी खेतमाळीस, राहुल निकुंभ, मनसेचे रवी लेंडे, गोपी शेठ पठारे, आशु मिसाळ, पत्रकार फिरोज शिकलकर, शिवशाही न्यूजचे पत्रकार फैजल पठाण आणि शिवाजी औटी यांच्यासह अनेक कार्यकर्ते नेहमी अग्रभागी राहून मोलाचे योगदान देतात.
राज्यभरात उपक्रमाची प्रशंसा
पोलीस बांधवांच्या कष्टाचा सन्मान करणारा हा उपक्रम केवळ शिरूर शहरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा विषय ठरला आहे. पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही परंपरा आगामी काळातही अशीच सुरू राहील, असा विश्वास फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











