मातृभक्ती आणि लोकपरंपरेचा अनोखा दस्तऐवज
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई - जात्यावरच्या ओव्या, पाळणे, उखाणे आणि अंगाई गीते ही ग्रामीण लोकजीवनाची अक्षरलेणी असून, स्त्रियांनी आपल्या कष्टमय जीवनातून या लोकपरंपरांचे जतन व संवर्धन केले. काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या या मौखिक परंपरेला पुस्तक रूप देणारा ‘गाणी हरिबाईची’ हा गीतसंग्रह लोकसंस्कृतीचा अमृतकुंभ आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.
‘गाणी हरिबाईची’ या गीतसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेव मस्कर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, हरिबाई शिंदे, तानाजीराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पाटणे म्हणाले, कोविडच्या काळात संपूर्ण जग ठप्प झाले असताना तानाजीराव शिंदे यांनी आपल्या आईला गाते केले. तिच्या ओव्यांमधून त्यांना सांस्कृतिक संपन्नता आणि आंतरिक सामर्थ्याची अनुभूती झाली. आईने अनेक वर्षे काळजात जपून ठेवलेल्या ओव्या, पाळणे आणि गीतांचे त्यांनी संकलन करून त्या कागदावर उतरवल्या. त्यामुळे एका आईच्या आठवणींसोबतच ग्रामीण लोकजीवनाचा मौखिक वारसाही या पुस्तकातून जतन झाला आहे.
जाते हे केवळ धान्य दळण्याचे साधन नसून लोकसंस्कृतीचे जागृत विद्यापीठ आहे. जात्यावरच्या ओव्यांतून स्त्रीमनातील सुख-दुःख, व्यथा-वेदना, देव-देवता, नातेसंबंध आणि लोकपरंपरांचे प्रत्ययकारी दर्शन घडते. आधुनिकतेच्या प्रवाहात हा अमूल्य वारसा दुर्मीळ होत असताना त्याचे दस्तऐवजीकरण होणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
तानाजीराव शिंदे यांनी आईच्या आठवणी आणि ओव्यांना ग्रंथरूप देऊन मातृभक्तीचा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी या प्रेरणेतून आपल्या परिसरातील लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. पाटणे यांनी केले.
महादेव मस्कर यांनी आईच्या मुखातून आलेल्या ओव्या, पाळणे आणि जात्यावरची गाणी पुस्तक रूपाने जतन करून तानाजीराव शिंदे यांनी वेगळा आदर्श निर्माण केल्याचे सांगितले. चंद्रकांत जाधव यांनी माय-लेकराच्या भावस्पर्शी नात्यावर प्रकाश टाकला. जयश्री शिंदे यांनी हरिबाई यांच्या मिश्किल स्वभावासह कुटुंबातील नातेसंबंधांच्या विविध पैलूंना उजाळा दिला.
प्रास्ताविकात तानाजीराव शिंदे यांनी सांगितले की, आईसोबत गप्पा मारताना तिच्याकडून ऐकलेल्या ओव्या, पाळणे आणि गाण्यांचे पुस्तक प्रकाशित करण्याची संकल्पना सुचली. कोविडच्या काळात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. या कार्यासाठी प्राचार्य डॉ. पाटणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पुस्तकाचे मुखपृष्ठ व अंतर्गत सजावटीसाठी प्रतिक कालेकर यांचे योगदान लाभले. प्रतिकूल परिस्थितीतही आम्हा भावंडांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या आईच्या गळ्यातून उमटलेला प्रत्येक स्वर आजही प्रेरणादायी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी गायक मच्छिंद्र नलावडे आणि तेजस्विनी पोरे यांनी पुस्तकातील पाळणे व ओव्या सुरेल स्वरात सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. सूत्रसंचालन केशव कोदे व अशोक येवले यांनी केले. अजिंक्य शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











