उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या हस्ते ४० वर्षांच्या शैक्षणिक सेवेचा गौरव
शिवशाही वृत्तसेवा छ.संभाजीनगर (मनोज चव्हाण)
कन्नड येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विजय नानासाहेब भोसले यांना महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श शिक्षक पुरस्कार’ (प्राचार्य संवर्ग) प्रदान करण्यात आला. पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऐतिहासिक संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित भव्य सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.
तब्बल १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर (२०१२ नंतर) शासनाने हे पुरस्कार पुनरारंभ केल्याने संपूर्ण शैक्षणिक वर्तुळातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित या सोहळ्याला पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोस्वामी, उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ. देवळाणकर आणि शिक्षण सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. डॉ. भोसले यांना शाल, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरणापूर्वी आयोजित विशेष बैठकीत नवीन शैक्षणिक धोरण, ऑन-जॉब ट्रेनिंग, प्लेसमेंट सेल, विद्यार्थी उपस्थिती आणि व्यसनमुक्ती यांसारख्या विविध विद्यार्थी-केंद्रित मुद्द्यांवर मंत्री महोदयांनी पुरस्कारार्थी प्राध्यापक व प्राचार्यांशी सविस्तर चर्चा केली.
या प्रसंगी प्रा. डॉ. भोसले यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. अश्विनी भोसले, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब मगर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. कृष्णा पाटील निकम, कार्यकारी मंडळ सदस्य श्री. विशाल आहेर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"४० वर्षांच्या निष्ठेची ही पोचपावती" : प्रा. डॉ. विजय भोसले"प्रत्येक व्यक्तीने कर्तव्यनिष्ठेने व समर्पण भावनेने काम केले, तर समाज आणि प्रशासन नक्कीच त्याची दखल घेते. गेल्या ४० वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात व संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कामाची ही फलश्रुती आहे. हे यश संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्रित समन्वयाचे फलित आहे."- प्रा. डॉ. विजय भोसले (प्राचार्य)
प्रा. डॉ. भोसले यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्कारामुळे कन्नड तालुक्यासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात अभिमानाचे वातावरण पसरले असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
































